थंडीच्या दिवसात कोरोना संक्रमण वाढण्याचा धोका

- केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६१ लाखांवर पोहोचली आहे. सध्या देशात दर दिवशी सुमारे ७० हजार नवे रुग्ण आढळत आहेत. तसेच या साथीने दगावणाऱ्यांची संख्या दिवसाला हजाराच्या खाली गेली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाव्हायरसचा जोर ओसरत असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी थंडीच्या दिवसात कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे जास्त सतर्कता बाळगा, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

देशातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या ७० लाख ७३ हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच आतापर्यंत १,०८००० जणांचा बळी या साथीमध्ये गेला आहे. याशिवाय यासाथीचे रुग्ण बरे होण्याचा दर ८६.१७ वर पोहोचला आहे. देशातील पाच राज्यातच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. यामध्येही अर्ध्याहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात उपचार सुरु असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या १२.३० टक्के आहे. गेल्या सलग आठ दिवसात प्रति दिवशी या साथीने बळी जाणाऱ्यांची संख्या हजाराहून कमी राहिली आहे. त्यामुळे या साथीचा जोर ओसरत असल्याचे दावे केले जात आहेत.

मात्र काही तज्ज्ञांकडून येत्या काळात कोरोनाचे संक्रमण वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याबाबतीत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी ही शक्यता नाकारता येणार नाही असे स्पष्ट केले. कोरोनाचा विषाणू रेस्पिरेटरी विषाणू आहे. असे विषाणू थंडीच्या मोसमात वाढतात. थंड हवामान विषाणूंचे संक्रमण वाढण्याचा धोका असतो. ब्रिटनमध्येही थंडीच्या दिवसात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून आली होती, याकडे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी लक्ष वेधले. लवकरच उत्सवांचा काळ सुरू होईल. या काळात नागरिक एकत्र येत असतात. म्हणून संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशावेळी नागरिकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक ठरेल., असे हर्ष वर्धन यांनी बजावले.

दरम्यान, देशात कोरोनावरील वेगवेगळ्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत आणि या चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. त्याचे निकाल येणे बाकी आहे. त्यामुळे या लसींचा आपत्कालीन वापर सुरू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अधोरेखित करून सांगितले. देशात कोरोना लसीवर संशोधकांची उच्चस्तरीय समिती काम करत आहे. पुढील वर्षी जुलै महिन्यात लस उपलब्ध होईल, अशी आशा आहे. तसेच लस सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे हर्षवर्धन म्हणाले.

leave a reply