जम्मू काश्मीरमध्ये ‘लश्कर’ कमांडरसह दोन दहशतवादी ठार

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलांचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत ‘लश्कर-ए-तोयबा’चा वरिष्ठ कमांडर झाहीद भट उर्फ झाहीद टाइगर सह दोन दहशतवादी ठार झाले. काश्मीर खोऱ्यात पुन्हा मोठ्या हिंसक कारवाया करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘लश्कर’साठी हा फार मोठा धक्का मनाला जात आहे.

पुलवामा जिल्ह्यातील दादूरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली. उडालेल्या चकमकीत शनिवारी उशिरा दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये ‘लश्कर’चा कमांडर भट याचा समावेश आहे. भट हा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. त्यामुळे सुरक्षादलांसाठी हे मोठे यश आहे या चकमकीत ठार मारण्यात आलेला दुसरा दहशतवादी ‘जैश-ए-मोहम्मद’चा आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळीच कुलगाम जिल्ह्यातील चिंगम परिसरात सुरक्षादलाचे जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. ठार मारण्यात आलेले दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे आहेत. या दहशतवाद्यांची नावे तारिक मीर आणि समीर भाई उस्मान अशी आहेत. हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानचे नागरिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

leave a reply