चीन हा अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू

- अमेरिकन जनतेची खात्री पटल्याचा ‘गॅलप पोल’चा अहवाल

वॉशिंग्टन – चीन हा अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू आहे. येत्या काळात चीन आर्थिक महासत्ता बनल्यास हा देश अमेरिकेसाठी धोकादायक ठरेल, अशी भीती अमेरिकी जनतेने एका सर्वेक्षणात व्यक्त केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चीनकडे शत्रू म्हणून पाहणार्‍या अमेरिकन्सची संख्या दुप्पटीने वाढल्याची नोंद या सर्वेक्षणात करण्यात आली आहे. येत्या काही तासात अलास्का येथे अमेरिका व चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये सहकार्याच्या पार्श्‍वभूमीवर बैठक होणार आहे. त्याआधी सदर सर्वेक्षणातून अमेरिकन जनतेमध्ये चीनबाबत असलेला रोष व्यक्त झाला आहे.

अमेरिकेतील ‘गॅलप’ या आघाडीच्या सर्वेक्षण आणि सल्लागार कंपनीने नुकताच एक पाहणी अहवाल प्रसिद्ध केला. ३ ते १८ फेब्रुवारी दरम्यान घेतलेल्या या सर्वेक्षणात अमेरिकेतील तरुण आणि प्रौढांची मते घेण्यात आली. यामध्ये ४५ टक्के अमेरिकन जनतेने चीन हा आपल्या देशाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे म्हटले आहे. वर्षभरापूर्वी याच सर्वेक्षणात सुमारे २२ टक्के जणांनी चीनला शत्रू मानले होते. त्यामुळे चीनकडे शत्रू म्हणून पाहणार्‍या अमेरिकन्सची संख्या वर्षभरात दुप्पटीने वाढल्याचे या पाहणीतून दिसत आहे.

यासाठी गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी जबाबदार असल्याचे सदर कंपनीचे म्हणणे आहे. अमेरिकेत आलेली कोरोनाची साथ हे चीनविरोधी रोषाचे प्रमुख कारण ठरले आहे. चीनच्या वुहानमधून कोरोनाव्हायरसचा जगभरात फैलाव झाला. अमेरिकेत या साथीने सर्वाधिक साडेपाच लाखाहून अधिक जण दगावले आहेत. यामुळे अमेरिकी जनतेमध्ये चीनविरोधात तीव्र नाराजी असल्याचा दावा सदर कंपनीने केला. त्याचबरोबर गेल्या दोन वर्षांपासून चीन-अमेरिकेत सुरू असलेले व्यापारयुद्ध, उघूरांवरील कारवाई, हाँगकाँगमधील लोकशाहीवर चीनने चढविलेले हल्ले आणि चीनचा शेजारी देशांबरोबरील तणाव देखील अमेरिकेतील चीनविरोधी नाराजीचे कारण मानले जाते.

कोरोनाच्या साथीमुळे अमेरिकेसह जगभरातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांना फटका बसला असून याकाळात चीनच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात वाढ झाल्याची नोंद अमेरिकी जनतेने या पाहणी अहवालात केली. अमेरिकेतील सुमारे ६३ टक्के जनतेने चीन जगातील आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर असल्याची चिंता व्यक्त केली. पण आर्थिक महासत्ता चीन पुढील दहा वर्षात अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी गंभीर धोकादायक ठरेल, असे मत या सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे.

अमेरिकन जनताच नाही तर अमेरिकेतील राजकीय पक्ष देखील चीनची अर्थव्यवस्था आपल्या देशासाठी धोकादायक असल्याचे मान्य करीत आहेत. सुमारे ८१ टक्के रिपब्लिकन्स आणि ५६ टक्के डेमोक्रॅट पक्षाच्या नेत्यांना चीनपासून अमेरिकेला धोका असल्याचे मान्य केले, असेही या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. तर यातील एक टक्का जनतेने अमेरिकाच हिच अमेरिकेचा सर्वात मोठी शत्रू असल्याचे मत नोंदविले आहे.

या सर्वेक्षणातून उघड झालेला अमेरिकन जनतेचा कल चीनधार्जिणे धोरण स्वीकारणार्‍या बायडेन प्रशासनासाठी अडचणीचा ठरू शकतो. कारण अमेरिकेला रशियाकडून सर्वाधिक धोका आहे आणि चीन हा अमेरिकेचा स्पर्धक आहे, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटले होते. मात्र अमेरिकन जनतेचा त्यावर विश्‍वास नसल्याचे ‘गॅलप पोल’ची पाहणी दाखवून देत आहे.

leave a reply