महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाच्या २६ हजार रुग्णांमुळे चिंता वाढली भर

- चोवीस तासातील आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्ण संख्येची नोंद

नवी दिल्ली/मुंबई – गरुवारी महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाचे २५ हजार ८३३ नवे रुग्ण आढळले, तर ५८ जणांचा बळी गेला. गेल्यावर्षी कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर चोवीस तासात राज्यात आढळलेले आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आहेत. गेल्यावर्षी कोरोनाच्या साथीने शिखर गाठले असतानाही महाराष्ट्रात चोवीस तासात इतके रुग्ण आढळले नव्हते. ११ सप्टेंबर २०२० राज्यात २४,८६६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. हे आतापर्यंतचे एका दिवसात सापडलेले सर्वाधिक रुग्ण होते. त्यामुळे गुरुवारी आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने चिंतेत भर घातली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या साथीच्या दुसर्‍या लाटेने सर्वांच्याच चिंतेत भर टाकली आहे. ही लाट थोपविता आली नाही, तर देशभरात ही साथ पुन्हा पसरण्याचा धोका असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला होता. महाराष्ट्रासह पंजाब, मध्य प्रदेशात, हरियाणात रुग्ण वाढत आहेत. मात्र सर्वात वेगाने महाराष्ट्रातच रुग्ण वाढताना दिसत आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात सुमारे १८ हजार नवे रुग्ण आढळले होते. तर बुधवारी चोवीस तासात आढळलेल्या रुग्णांची संख्या २३ हजारांवर पोहोचली होती. तर गुरुवारी एका दिवसात सुमारे २६ हजार नवे रुग्ण आढळले. यावरून राज्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने फैलावत असल्याचे स्पष्ट होते.

गुरुवारी मुंबईत २८७७ नवे रुग्ण सापडले. धारावीत ३० नवे रुग्ण आढळले आहेत. ठाणे मंडळात ५१९० रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ४४३ कोरोना रुग्ण ठाणे महापालिका क्षेत्रात, तर ५६० रुग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळले आहेत. पुणे मंडळात सर्वाधिक ५५८३ इतके नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रात २६११ रुग्णांची नोंद झाली आहे, तर पिंपरी-चिंचवडमध्ये १२७२ नवे रुग्ण आढळले. नागपूर परिमंडळात ४५२३ इतके रुग्ण साडपले असून नागपूर शहरात बिकट परिस्थिती आहे. नागपूर पालिका क्षेत्रात २९२६ इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. नाशिक मंडळात ४,५१७ नवे रुग्ण आढळले आहेत. अकोला मंडळात २२९९, तर औरंगाबाद मंडळात २२२५ नव्या रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे आता अधिक कठोर पद्धतीने जनतेकडून नियमांचे पालन करून घ्यावे लागेल. गेल्यावर्षी कोरोनाच्या साथीने शिखर गाठले असताना लस उपलब्ध नव्हती. पण आता लस उपलब्ध आहे, हिच दिलासादायक गोष्ट आहे. त्यामुळे नियम पालनाबरोबर लसीकरणाचा वेग आता वाढवावा लागणार आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, देशात गुरुवारच्या सकाळपर्यंतच्या २४ तासात ३५ हजार नव्या रुग्णांची नांेंद झाली होती. यातील ६० टक्क्याहून अधिक रुग्ण महाराष्ट्रातील होते. तसेच ८० टक्के रुग्ण हे केवळ पाच राज्यातील आहेत. १०२ दिवसांनंतर देशात चोवीस तासात इतक्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ६ डिसेंबर रोजी देशात ३६ हजार नवे रुग्ण सापडले होते. आतापर्यंत देशात आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या एक कोटी १४ लाख ७४ हजारांवर गेली आहे.

leave a reply