इराणने रासायनिक, आण्विक आणि जैविक हल्ल्यांसाठी तयार रहावे

- इराणचे संरक्षणमंत्री आमिर हातामी

तेहरान – ‘इराणचे शत्रू कधीही आपल्यावर रासायनिक, आण्विक आणि जैविक हल्ले चढवू शकतात. मानवतेचे शत्रू असणारे हे देश आपली लष्करी उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी इराणविरोधात सर्व पर्यायांचा वापर करतील. तेव्हा इराणने कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यांसाठी सज्ज रहायला हवे’, असा इशारा इराणचे संरक्षणमंत्री आमिर हातामी यांनी दिला. त्याचवेळी या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी इराणच्या संरक्षण मंत्रालयाने सारी सज्जता ठेवलेली आहे, असेही हातामी पुढे म्हणाले.

इराकच्या कुर्दिस्तान प्रांतातील हलाबा शहरावर तत्कालिन हुकूमशहा सद्दाम हुसेन यांनी चढविलेल्या मस्टर्ड गॅसच्या रासायनिक हल्ल्याला नुकतीच ३३ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने इराणमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्री हातामी यांनी या इतिहासाची उजळणी करून इराणच्या जनतेने रासायनिक तसेच आण्विक व जैविक हल्ल्यांसाठी देखील तयार रहावे, असे बजावले. शत्रू देश इराणवर हल्ले चढविण्यासाठी यापैकी कुठल्याही किंवा सर्व पर्यायांचा वापर करू शकतात, असा इशारा हातामी यांनी दिला. तसेच सावध असलेल्या इराणच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्यांचा सामना करण्याची तयारी केली आहे, असे संक्षणमंत्री हातामी पुढे म्हणाले. जैविक क्षेत्र ही युद्धाची आघाडीच आहे, असे हातामी यांनी ठासून सांगितले. ‘सध्या जग अशाच एका महामारीचा सामना करीत आहे. गेल्या वर्षी घातपातात ठार झालेले इराणचे शास्त्रज्ञ फखरीझादेह यांनी कोरोनाप्रतिबंधक लस तयार करण्यात मोठे योगदान दिले होते.

फखरीझादेह यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच माझ्याशी बोलताना या महामारीची जाणीव करून दिली होती व त्यानंतर जगभरात ही महामारी पसरली’, असा दावा हातामी यांनी केला. इराणने कोरोनाप्रतिबंधक लस तयार केली असून त्याला ‘फखरवॅक’ असे फखरीझादेह यांचे नाव दिले आहे.

संरक्षणमंत्री हातामी यांच्यानंतर इराणच्या संरक्षणदलाचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद बाघेरी यांनी इस्रायलला धमकावले. इस्रायलला उडवून देण्याइतके सामर्थ्य आज इराणकडे असल्याचा इशारा बाघेरी यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच इराणच्या नेत्यांनी इस्रायलच्या विनाशाच्या तसेच हैफा, तेल अविव ही इस्रायली शहरे जमिनदोस्त करण्याच्या धमक्या दिल्या आहेत.

दरम्यान, इस्रायलला धमक्या देणार्‍या इराणच्या अणुकार्यक्रमावर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. इराणने आपल्या नातांझ अणुप्रकल्पात नवे प्रगत सेंट्रिफ्यूजेस वापरून युरेनियमचे संवर्धन सुरू केल्याचे आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

इराणच्या अणुप्रकल्पातील या हालचाली २०१५ सालच्या अणुकराराचे उल्लंघन असल्याचा दावा केला जातो. या व्यतिरिक्त, इराणने कुवैतच्या सीमेजवळ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा नवा तळ सुरू केल्याची माहिती अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली आहे.

leave a reply