सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या दौऱ्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या दोन विनाशिकांची तैवानच्या सागरी क्षेत्रात गस्त

taiwan straitतैपेई/वॉशिंग्टन – अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या दौऱ्यानंतर प्रथमच अमेरिकी विनाशिकांनी तैवानच्या सागरी क्षेत्रातून गस्त घातली. पेलोसी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने तैवाननजिक व्यापक व आक्रमक स्वरुपाचे युद्धसराव आयोजित केले आहेत. हे सराव सुरू असतानाच अमेरिकेने आपल्या दोन विनाशिका धाडून चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर दिल्याचे सांगण्यात येते. अमेरिकी विनाशिकांच्या प्रवासावर चीनची प्रतिक्रिया उमटली असून अमेरिकी युद्धनौकांवर बारीक लक्ष असल्याचे चीनने बजावले.

Nancy-Pelosi-visitया महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिली होती. अमेरिकी सभापतींची ही भेट वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. चीनने सदर भेट म्हणजे चिथावणी असल्याचे सांगून तैवानवर जबरदस्त दडपण आणण्यास सुरुवात केली होती. अमेरिका व तैवानच्या नेतृत्त्वाने इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर चीन जोरदार प्रत्युत्तर देईल, अशी धमकीही दिली होती. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने तैवानपासून जवळ असलेल्या आपल्या प्रांतांमध्ये लष्करी जमवाजमवही सुरू केली होती.

5 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान चीनने 620 लढाऊ विमानांना तैवानच्या दिशेने रवाना केले होते. यापैकी जवळपास 300 लढाऊ व बॉम्बर विमानांनी तैवानची ‘मिडियन लाईन’ अर्थात मध्यरेषा ओलांडली. चीनची ही वाढती घुसखोरी म्हणजे युद्धाचे पूर्वसंकेत असल्याचे इशारे विश्लेषक तसेच अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या दोन विनाशिकांनी तैवानच्या सागरी क्षेत्रात घातलेली गस्त लक्ष वेधून घेणारी ठरते. अमेरिकेच्या ‘युएसए चॅन्सेलरव्हिले’ व ‘युएसएस अँटिटॅम’ यांनी घातलेली गस्त ही मुक्त सागरी वाहतुकीच्या नियमांचा भाग असल्याचा खुलासा अमेरिकी नौदलाकडून करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी चीनच्या विमानवाहू युद्धनौकेने साऊथ चायना सीमध्ये गस्त घातली होती. त्यानंतर अमेरिकेने आपल्या विनाशिका पाठवून चीनला संदेश दिल्याचे मानले जाते.

leave a reply