ऑस्ट्रेलियन निवेदिकेच्या अटकेवरून चीन-ऑस्ट्रेलिया तणाव वाढला

कॅनबेरा/बीजिंग – ऑस्ट्रेलियन वृत्तनिवेदिका चेंग लेईला कोणतेही ठोस कारण न देता चीनने नजरकैदेत टाकले असून, या मुद्द्यावरून ऑस्ट्रेलिया व चीनमधील तणाव अधिकच चिघळण्याचे संकेत मिळत आहेत. लेई चीनच्या ‘सीजीटीएन’ या सरकारी वृत्तवाहिनीसाठी काम करत असून त्या ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत. गेल्या महिन्यात चिनी यंत्रणांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती. आता अचानक लेई यांना अटक केल्याची माहिती देण्यात आली असून त्यासाठी कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. लेई यांच्या अटकेचा ऑस्ट्रेलियाने निषेध केला असून, त्यांना सर्व प्रकारचे कायदेशीर सहाय्य पुरविण्याचा प्रयत्न केला जाईल असे म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियन निवेदिकेच्या अटकेवरून चीन-ऑस्ट्रेलिया तणाव वाढलागेल्या काही वर्षांपासून चेंग लेई चिनी वृत्तवाहिनी ‘सीजीटीएन’च्या इंग्रजी आवृत्तीसाठी काम करीत आहेत. ऑगस्ट महिन्यात चिनी यंत्रणांनी त्यांना अचानक ताब्यात घेतले होते. १४ ऑगस्टला ऑस्ट्रेलियाला यासंदर्भात माहिती देण्यात आली. मात्र लेई यांच्याशी राजनैतिक तसेच कायदेशीर स्तरावर कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्यास चीनकडून नकार देण्यात आल्याचे ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. लेई यांची चौकशी अथवा अटक याबाबत कोणतेही कारण देण्यात आले नसून, हेरगिरीच्या संशयावरून कारवाई झाली असावी, असा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियन निवेदिकेच्या अटकेवरून चीन-ऑस्ट्रेलिया तणाव वाढलागेल्या वर्षभरात चिनी वंशाच्या ऑस्ट्रेलियन नागरिकांविरोधात चीनच्या यंत्रणांकडून कारवाई होण्याची ही दुसरी घटना आहे. काही महिन्यांपूर्वी चीनने डॉ. यांग हेंगजून या ऑस्ट्रेलियन नागरिकाला ताब्यात घेऊन त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवला होता. चीनच्या या कारवाईवर ऑस्ट्रेलियाने तीव्र निषेध नोंदविला होता. त्यानंतर आता कोणत्याही कारणाशिवाय लेई यांच्यावर कारवाई झाल्याने ऑस्ट्रेलिया व चीनमध्ये निर्माण झालेला तणाव अधिकच चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.

लेई यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू असतानाच, ऑस्ट्रेलियाच्या संसदेत चीनसह इतर परदेशी राजवटींबरोबर केलेल्या करारांवर फेरविचार करण्याची तरतूद असणारे विधेयक दाखल करण्यात आले आहे. या विधेयकावर चिनी प्रसारमाध्यमांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. चीनचे सरकारी मुखपत्र म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ‘ग्लोबल टाईम्स’ने २४ तासांच्या अवधीत दोन संपादकीय लेख प्रसिद्ध करून, सदर विधेयकाविरोधात आगपाखड केली आहे. ऑस्ट्रेलिया अमेरिकेच्या निर्देशांवर चीनविरोधी धोरण राबवित असून, याच मार्गावर चालत राहिल्यास हा देश लवकरच आशिया-पॅसिफिक मधील सर्वात गरीब देश म्हणून ओळखला जाईल, असा टोमणा लेखात मारण्यात आला आहे.

leave a reply