दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील स्वातंत्र्य, लोकशाही व अमेरिकी सुरक्षेसाठी चीन सर्वात मोठा धोका

- अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखांचा इशारा

मोठा धोका

वॉशिंग्टन/बीजिंग – ‘अमेरिकेवर मात करून चीनला संपूर्ण जगावर आर्थिक, लष्करी व तंत्रज्ञानदृष्ट्या एकतर्फी वर्चस्व मिळवायचे आहे. चीनच्या कारवाया या अमेरिकी सुरक्षेसाठीच नाही, तर जागतिक लोकशाही व स्वातंत्र्यासाठी दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा धोका ठरतो’, असा इशारा अमेरिकेचे गुप्तचर प्रमुख जॉन रॅटक्लिफ यांनी दिला. जगावर सत्ता मिळविण्याच्या ईर्षेने चीन सर्व नैतिक मर्यादांचे उल्लंघन करीत असल्याचा ठपका ठेऊन, चिनी जवानांना ‘सुपर सोल्जर’ बनविण्यासाठी त्यांच्यावर जैविक चाचण्या सुरू केल्याचा खळबळजनक दावाही अमेरिकी गुप्तचर प्रमुखांनी केला.

मोठा धोका

अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत तसेच ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या आघाडीच्या दैनिकात लिहिलेल्या लेखातून गुप्तचर प्रमुख रॅटक्लिफ यांनी चीनविरोधात जोरदार हल्ला चढविला. ‘चीन अमेरिकेविरोधात उघड संघर्षाची तयारी करीत आहे आणि त्याचा मुकाबला करणे हे आपले कर्तव्य आहे. चीनचे आव्हान हे अमेरिकेतील सध्याच्या पिढीसमोर असलेले सर्वात मोठे व निर्णायक आव्हान आहे. अमेरिकेने फॅसिझमपासून ते पोलादी पडदे खेचण्यापर्यंत अनेक आव्हानांवर खंबीरपणे मात केली आहे. चीन संपूर्ण जगाचा चेहरामोहरा बदलून तो त्यांच्यासारखाच असावा, यासाठी धडपडत आहे. अमेरिकेला पिछाडीवर सोडून जगातील एकमेव महासत्ता बनण्यावर चीनने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. अशा चीनला सध्याची पिढी कशी रोखते, यावर पुढील भवितव्य अवलंबून आहे’, असे रॅटक्लिफ यांनी बजावले.

मोठा धोका

जगावर वर्चस्व मिळविण्यासाठी चीनची राजवट कोणत्याही नैतिक मर्यादा पाळत नसल्याचा आरोपही गुप्तचर प्रमुखांनी केला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना चीनचे लष्कर जगातील सर्वात शक्तिशाली व सामर्थ्यशाली बनवायचे असून त्यासाठी अमेरिकी तंत्रज्ञान चोरण्यापासून इतर कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी असल्याचा ठपका रॅटक्लिफ यांनी ठेवला. चीन आपल्या जवानांना ‘सुपर सोल्जर’ बनविण्यासाठी त्यांच्या शारिरीक क्षमता वाढविणाऱ्या चाचण्या करीत असल्याची माहिती अमेरिकी यंत्रणांकडे आहे, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला. गेल्या वर्षी अमेरिकेतील काही संशोधकांनी चीनकडून जैवतंत्रज्ञानाचा वापर करून ‘सुपर सोल्जर’ बनविण्याचे प्रयत्न सुरू असल्याकडे लक्ष वेधले होते. गुप्तचर प्रमुखांच्या आरोपांमुळे त्याला दुजोरा मिळाल्याचे दिसत आहे.

चीन अमेरिकेतील राजकीय व्यवस्थेवर प्रभाव टाकण्याच्याही हालचाली करीत असून गेल्या वर्षभरात अशा कारवायांचा वेग वाढल्याची जाणीव अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखांनी करून दिली. चीनच्या यंत्रणा अमेरिकी संसद सदस्यांवर लाच अथवा ब्लॅकमेलच्या स्वरुपात दडपण आणण्याचे प्रयत्न करीत आहे, असा दावा रॅटक्लिफ यांनी केला. चीनकडून सुरू असलेल्या या प्रयत्नांची माहिती अमेरिकेच्या संसदेतही देण्यात आली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. निवडणूक संपली आहे, आता अमेरिकेतील राजकीय नेतृत्त्वाने चीनबाबत ठोस व खंबीर भूमिका घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात गुप्तचर प्रमुख रॅटक्लिफ यांनी अखेरीस बजावले.

गुप्तचर प्रमुखांनी चीनविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘रॅटक्लिफ यांचे वक्तव्य अवाजवी व तथ्याला धरुन नाही. अमेरिका अजूनही शीतयुद्धकालिन मानसिकतेत वावरते आहे. काही अमेरिकी अधिकारी पूर्वग्रहदूषित विचारसरणीतून चीनवर हल्ले चढवित आहेत’, असा ठपका अमेरिकेतील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्यांनी ठेवला आहे.

leave a reply