चीनच्या ‘बीआरआय’ला म्यानमार आणि पाकिस्तानमध्ये हादरे

नौ पी ता/ इस्लामाबाद – म्यानमारने चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’चे (बीआरआय) काही प्रकल्प रद्द केल्यानंतर हादरा बसलेला चीन खडबडून जागा झाला आहे. चीनच्या जिनपिंग राजवटीतील वरिष्ठ अधिकारी ‘यांग जिएची’ हा प्रकल्प वाचविण्यासाठी तातडीने म्यानमारला भेट दिल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी पाकिस्तानमधूनही चीनच्या ‘बीआरआय’ला जबर हादरे बसत आहे. पाकिस्तानमधील तालिबानकडून चीनच्या प्रकल्पांना धोका असून असे झाले तर पाकिस्तानमध्ये आर्थिक हाहाकार माजेल, असा इशारा पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍यांनी दिला आहे. या व्यतिरिक्त युरोपिय देशांमध्येही चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘बीआरआय’ची कोंडी झाल्याच्या बातम्या गेल्या महिन्यात समोर आल्या होत्या.

चीनच्या 'बीआरआय'ला म्यानमार आणि पाकिस्तानमध्ये हादरेचीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या पाकिस्तान आणि श्रीलंकेपासून धडा घेऊन म्यानमारने काही दिवसांपूर्वी ‘बीआरआय’मधले काही प्रकल्प रद्द केले. चिनी प्रकल्पांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप म्यानमारने केला होता. यानंतर अस्वस्थ झालेल्या चीनने वरिष्ठ अधिकारी यांग जिएची यांना म्यानमारमध्ये रवाना केले आहे. यांग जिएची यांनी म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर ‘आँग सँन स्यू की’, राष्ट्राध्यक्ष विन मिंट आणि लष्करी अधिकार्‍यांची भेट घेऊन म्यानमारची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चीनने म्यानमारसमोर काही प्रस्ताव ठेवले. पण या प्रस्तावानंतरही म्यानमारमधील चीनच्या ‘बीआरआय’चा प्रश्न निकालात लागला नसल्याचे दावे म्यानमारी माध्यमे करू लागली आहेत. म्यानमारमध्ये चीनच्या ‘बीआरआय’ला हादरे बसत असल्याची माहिती उघड होत नाही, तोच पाकिस्तानातूनही तशीच माहिती समोर येऊ लागली आहे.

चीनच्या 'बीआरआय'ला म्यानमार आणि पाकिस्तानमध्ये हादरेपाकिस्तानमध्ये ‘तेहरिक ए तालिबान’ तसेच ‘जमात-ऊल-अहरार’, ‘हिजाब हुल अहरार’ आणि ‘मेहसूद’ हे गट एकत्र आले आहेत. २०१४ साली पाकिस्तानातील तालिबानच्या या गटांमध्ये फूट पडली होती. पण पाकिस्तानातील सरकार आणि लष्कराविरोधात असलेल्या या तालिबानींकडून ‘बीआरआय’च्या प्रकल्पांना धोका निर्माण झाला आहे. तालिबानचे दहशतवादी ‘बीआरआय’ प्रकल्प आणि चिनी कामगारांवर हल्ले चढवतील, अशी भिती पाकिस्तानातील लष्करी अधिकार्‍यांनी जपानी माध्यमाशी बोलताना वर्तविली. खैबर पख्तून प्रांतात मोठ्या प्रमाणावर चिनी प्रकल्पांची कामे सुरु आहेत. या दुर्गम भागात तालिबान व संलग्न संघटनांचे वर्चस्व आहे. त्यामुळे इथल्या प्रकल्पांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जाते. तालिबानने ‘सीपीईसी’ आणि इतर प्रकल्पांवर हल्ले चढविले तर पाकिस्तानमध्ये आर्थिक हाहाकार माजेल व पाकिस्तान अस्थिर होईल’, असा इशारा या लष्करी अधिकार्‍याने दिला.

आधीच पाकिस्तानमध्ये ‘सीपीईसी’विरोधात जनता संतापली आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये जनतेकडून या प्रकल्पाविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत. तर बलोच बंडखोरांकडून सीपीईसीवरचे हल्ले वाढले आहेत. शिवाय सीपीईसीमध्ये मोठा भष्ट्राचार होऊन पाकिस्तानचे लष्करी अधिकारी यात गुंतल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या सरकारसमोर आता ‘सीपीईसी’च्या सुरक्षेचे आव्हान वाढले आहे.

दरम्यान, चीनने २०१३ साली मोठा गाजावाजा करुन ‘बीआरआय’ची घोषणा केली. जवळपास ७० देश यात सहभागी झाले होते. पण चीनचे यामागील उद्दीष्ट लक्षात आल्यानंतर काही देश ‘बीआरआय’मधून माघार घेत आहे. त्यामुळे चीन कमालीचा अस्वस्थ झाला आहे.

leave a reply