दक्षिण भारतातील पहिल्या किसान रेल्वेला सुरुवात

नवी दिल्ली – देशातल्या पहिल्या ‘किसान रेल्वे’ला मिळालेल्या उस्फूर्त प्रतिसादानंतर आता अनंतपूर आणि दिल्लीमधील आदर्श नगर देशातील दुसरी किसान रेल्वे सुरु झाली आहे. दक्षिण भारतातून धावणारी ही पहिली किसान रेल्वे असून ३२२ टन फळे घेऊन ही ट्रेन दिल्लीला रवाना करण्यात आली. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे या गाडीला हिरवा कंदील दाखविला.

किसान रेल्वे

”कृषी उत्पादनास शक्य तितक्या चांगल्या वितरणाची आणि परताव्याची गरज आहे. किसान रेल्वे शेतकऱ्यांचा माल एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करेल. अनंतपूरमध्ये २ लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रावर फळे आणि भाज्यांचे उत्पन्न घेतले जाते आणि किसान रेल्वे या भागातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याची ठरेल. लवकरच किसान उडान सेवाही सुरू केली जाईल”, असे तोमर म्हणाले.

अनंतपूर नवी दिल्ली दरम्यान सुरु करण्यात आलेल्या या किसान रेल्वेमधून टोमॅटो, केळी, संत्री, पपई, टरबूज आणि आंबे असा ३२२ टन शेतमाल पाठवण्यात आला. दक्षिण भारतातून धावणारी ही पहिली किसान रेल्वे ४० तासांत २१५० कि.मी. प्रवास करेल. किसान रेल्वेच्या रेकमध्ये १४ पार्सल व्हॅन आहेत. यातील ४ व्हॅन नागपूरसाठी आणि इतर १० व्हॅन आदर्श नगरसाठी आहेत. अनंतपुर हे आंध्रप्रदेशचे फळ उत्पादक क्षेत्र आहे.

किसान रेल्वे

जिल्ह्यातील ५८ लाख मेट्रिक टन फळ आणि भाजीपाल्याच्या उत्पनापैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त माल राज्याच्या बाहेरील बाजारपेठांमध्ये विशेषतः दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये विकला जातो. अनंतपुरात उत्पादन करण्यात येणारी फळे आणि भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात राज्याच्या बाहेर वाहतूक केली जाते. आतापर्यंत ही वाहतूक रस्ते मार्गाने करण्यात येत होती. मात्र आता किसान रेल्वे सुरु झाल्यामुळे लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्यांचे उत्पादन सुरक्षित, किफायतशीर आणि लवकरात लवकर देशभर विकण्यासाठी मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट सरकारने ठेवले आहे. यादृष्टीने सुरु करण्यात येत असलेल्या किसान रेल्वे महत्वाच्या ठरणार आहेत. याआधी महाराष्ट्रातील देवळाली आणि बिहारमधील दानापूर दरम्यान किसान रेल्वेची साप्ताहिक सेवा सुरु करण्यात आली होती. या रेल्वेला मिळणार प्रतिसाद पाहता ही सेवा आठवड्यातून दोन वेळा सुरु करण्यात आली. आता दुसरी किसान रेल्वे सुरु करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा प्रमाणात लाभ मिळेल.

leave a reply