भारत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आक्रमक भूमिकेत आहे

-ग्लोबल टाईम्सचा आरोप

नवी दिल्ली – ‘सीमेवर सैन्याने आक्रमक हालचाली करायच्या आणि वाटाघाटी करताना मात्र राजनैतिक कौशल्याचा वापर करायचा, असा जुना डाव भारत चीनबरोबर खेळत आहे. पण चीन भारताला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे’, असे चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने म्हटले आहे. तसेच भारत राष्ट्रवादाच्या नशेच्या अमलाखाली असल्याचा चिथावणीखोर शेरा ग्लोबल टाईम्सने मारला आहे. चीनच्या या सरकारी मुखपत्रामधून भारताच्या विरोधात केली जाणारी बाष्कळ विधाने, आरोप आणि धमक्यांचे सत्र बुधवारीही सुरू ठेवले. तर लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव अजूनही कायम असून इथे चीनने आपल्या लष्कराच्या तीन बटालियन तैनात केल्या आहेत. पण चीनने कितीही तैनाती केली तरी पूर्ण सुसज्ज असलेल्या भारतीय सैन्याच्या विरोधात कारवाई करणे, जवळपास अशक्यप्राय बनल्याचा अनुभव चीनच्या लष्कराला मिळत आहे.

‘ग्लोबल टाईम्स’

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याने पहिली गोळी झाडल्याचा आरोप चीनने केला होता.

लडाख सीमेवर भारतीय लष्कराने गोळीबार करून अत्यंत गंभीर परिस्थितीला आमंत्रण दिले होते. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध पडण्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. पण चीनच्या लष्कराने दाखविलेला संयम यामुळे हा धोका टाळला, असा दावा ग्लोबल टाईम्सने केला आहे. पुढच्या काळात भारताने असे धोके पत्करता कामा नयेत, असा इशारा ग्लोबल टाईम्स’ने दिला आहे. त्याचवेळी चीनबरोबर वाटाघाटी करीत असताना राजकीय कौशल्य व चातुर्याचे प्रदर्शन करणारा भारत, प्रत्यक्ष सीमेवर मात्र आक्रमक हालचाली करीत आहे. हा भारताचा जुना डाव आहे, याची पूर्ण कल्पना असून त्याला तोंड देण्याची पूर्ण तयारी चीनने केली आहे, असा दावाही ग्लोबल टाईम्सने केला.

‘ग्लोबल टाईम्स’सध्या भारत राष्ट्रवादाच्या नशेच्या अमलाखाली आहे. त्यामुळे भारत सरकारला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या विरोधात आक्रमक भूमिका स्वीकारावी लागत आहे. भारतातील काही युद्धखोर यासाठी सरकारवर दडपण आणत आहेत, अशी टीका ग्लोबल टाईम्सने केली आहे. मात्र चीनमधील परिस्थिती वेगळी असून चीन अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळत असल्याचे ग्लोबल टाइम्स’ने म्हटले आहे. लवकरच हिवाळा सुरू होणार असून लडाखच्या क्षेत्रात सैन्य तैनाती ठेवणे दोन्ही देशांसाठी अवघड ठरेल, याचीही आठवण ग्लोबल टाईम्सने करून दिली. त्याचवेळी मॉस्कोमध्ये होणार्‍या एससीओ’च्या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, असे सांगून या चर्चेकडून अपेक्षा असल्याचे चीनच्या सरकारी मुखपत्राने म्हटले आहे.

२०१७ साली भुतानच्या डोकलाम येथे भारत आणि चीनच्या सैन्याचा सामना झाला होता. सत्तर दिवसांहून अधिक काळ दोन्ही देशांचे सैनिक येथे एकमेकांसमोर खाडे टाकले होते. त्या काळातही ग्लोबल टाईम्सने भारताला युद्धाच्या धमक्या दिल्या होत्या. अवघ्या काही दिवसात चीनचे सैन्य दिल्ली काबीज करू शकेल, असे दावे ग्लोबल टाईम्सने ठोकून दिले होते. पण प्रत्यक्षात चीनच्या लष्कराला डोकलाम मध्येही भारतीय सैनिकांसमोर काही करता आले नव्हते, प्रचार युद्धाचा भाग म्हणून चीनकडून ग्लोबल टाईम्सचा वापर केला जातो. भारतीय माध्यमे उथळ असून चीनच्या विरोधात अतिरेकी भूमिका घेत असतात, असे शेरे देखील ग्लोबल टाईम्सने मारले आहेत. पण प्रत्यक्षात चीनचे हे सरकारी दैनिक सवंगपणे भारतावर बेताल आरोप करीत असल्याचे अनेकवार समोर आले आहे. पुढच्या काळातही ग्लोबल टाईम्स आधीपेक्षा वेगळी भूमिका घेण्याची शक्यता नाही. मात्र ग्लोबल टाईम्सच्या बेलगाम टीकेतून चीनची अस्वस्थता व्यक्त होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

डोकलामच्या बाबत भारताने स्वीकारलेली अत्यंत संयमी, पण कणखर भूमिका चीनला माघार घेण्यास भाग पाडणारी होती. या आघाडीवर भारताने चीनवर पूर्णपणे मात केली, असेही पाश्चिमात्त्य विश्लेषक व माध्यमांचे म्हणणे होते. आत्ताही लडाखमधील परिस्थिती भारताच्या नियंत्रणात असून भारताने चीनची कोंडी केल्याचा दावा पाश्चिमात्य विश्लेषक करीत आहेत. भारताच्या विरोधात नक्की कुठली कारवाई करायची, याबाबत चीन गोंधळलेला असल्याचे दावे पाश्चिमात्य माध्यमांकडून केले जात आहेत. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीमध्ये निर्माण झालेला हा गोंधळ ग्लोबल टाईम्स मधूनही व्यक्त होत असल्याचे पहायला मिळत आहे.

leave a reply