देशातील कोरोनाच्या ऍक्टिव्ह केसेसची संख्या १० लाखांवर

नवी दिल्ली – सलग ३० दिवशी देशात कोरोनाच्या ऍक्टिव्ह केसेसमध्ये मोठी वाढ झाली आहे. ऍक्टिव्ह केसेस दहा लाखांजवळ पोहोचल्या असून फेब्रुवारीमध्ये ही ऍक्टिव्ह केसेसची संख्या दीड लाखांपेक्षा कमी होती. गुरुवारपासून शुक्रवारच्या सकाळपर्यंत देशात कोरोनाचे १ लाख ३० हजार नवे रुग्ण आढळले. हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला. मात्र शुक्रवारी रात्री विविध राज्यांकडून जाहीर झालेल्या दिवसभरातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता परिस्थिती आणखी बिघडली असल्याचे लक्षात येते. शुक्रवारी महाराष्ट्रात ५९ हजार नवे रुग्ण आढळले, तर ३०० जणांचा बळी गेला. कर्नाटक आणि दिल्लीमध्ये ८ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

देेशात कोरोनाच्या साथीमुळे उद्भवलेली स्थिती दिवसेंदिवस अधिक बिघडत असून कित्येक ठिकाणी निष्काळजीपणा कोरोनाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे. देेशात कोरोनाच्या साथीचे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने घसरत आहे. हा दर महिनाभरात ९८ टक्क्यांवरून ९१.२२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर ऍक्टिव्ह केसेसची संख्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत ७.५ टक्क्यांवर पोहोचली आहे. १२ फेब्रुवारीला ऍक्टिव्ह केसेसचे हेच प्रमाण केवळ १.२५ टक्के होते. तर एकूण ऍक्टिव्ह केसेस १ लाख ३६ हजार होत्या. तसेच देशात चोवीस तासात ७८० जणांना कोरोनामुळे बळी गेला असून ऑक्टोबरनंतर एका दिवसात कोरोनाने झालेले हे सर्वाधिक मृत्यु आहे. यामुळे देशात या साथीने बळी गेलेल्यांची संख्या १ लाख ६८ हजारांजवळ पोहोचली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक भीषण परिस्थिती असून रुग्णालयातून बेड उपलब्ध होत नसल्याची कित्येक तक्रारी येत आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारीही ५९ हजार नवे रुग्ण आढळले, तसेच ३०१ जण दगावाले. मुंबईत ९ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली, तर नागपूरात सर्वाधिक ६४ जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात दोन दिवसांच्या विकएन्ड लॉकडाऊनला सुरूवात झाली असून अत्यावश्यक सेवा वगळता या दोन दिवसात सर्वकाही बंद राहणार आहे. तसेच पुढील आठवडयात लागोपाठ दोन सर्वजनिक सुट्ट्या येत असल्याने या दिवशीही लॉकडाऊन लावण्याचा विचार होत आहे. व्यापारी लॉकडाऊनचा विरोध करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात आली असून या बैठकीत कोरोनाची साथ रोखण्याकरीता उपाययोजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण तमिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, पिश्‍चम बंगाल, उत्तर प्रदेश व पंजाबमध्ये आढळत आहेत. गुरुवारी तमिळनाडून १२८४०, कर्नाटकात १२७६७, द्लिीत ११,१५७, पश्‍चिम बंगालमध्ये १०३७०, उत्तर प्रदेशात ९ हजार व पंजाबमध्ये ७३३४ नव्या रुग्णांची नांेंद झाली होती.

leave a reply