इराणला समज देण्यासाठी इस्रायल-सौदी-बाहरिन-इजिप्तच्या लढाऊ विमानांची अमेरिकन बॉम्बरसह गस्त

वॉशिंग्टन – इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत पाश्‍चिमात्य देशांच्या चिंता वाढत असताना, अमेरिकन हवाईदलाच्या ‘बी-१बी’ स्ट्रॅटेजिक बॉम्बर विमानाने आखाती क्षेत्रात गस्त घातली. इस्रायलचे लढाऊ विमान यावेळी अमेरिकेच्या बॉम्बरच सोबत असल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. इस्रायली लढाऊ विमानासह सौदी अरेबिया, बहारिन, इजिप्त या देशांची लढाऊ विमानेही विविध टप्प्यावर या अमेरिकी बॉम्बरसोबत काही काळ उड्डाण करीत होती. ही संयुक्त गस्त म्हणजे इराणला दिलेला आणखी एक इशारा असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहे.

इराणला समज देण्यासाठी इस्रायल-सौदी-बाहरिन-इजिप्तच्या लढाऊ विमानांची अमेरिकन बॉम्बरसह गस्तइराणच्या हवाईदलाने रविवारी ‘बी-१बी’ बॉम्बरच्या गस्तीची माहिती प्रसिद्ध केली. आखातातील लष्करी तळावरुन उड्डाण केलेल्या या बॉम्बर विमानाने होर्मुझचे आखात, पर्शियन आखात, बाब अल-मंदाबचे आखात, रेड सी आणि त्यानंतर सुएझ कालव्यावरुन उड्डाण केले. या प्रवासात आखातातील मित्रदेशांच्या लढाऊ विमानांनी बी-१बी बॉम्बर विमानाला साथ दिल्याचे अमेरिकेच्या हवाईदलाने सांगितले. यामध्ये इस्रायलसह सौदी अरेबिया, बहारिन आणि इजिप्तच्या लढाऊ विमानांचा सहभाग होता.

यापैकी इस्रायलच्या लष्कराने बी-१बी बॉम्बरसोबत इस्रायली हवाईदलाचे एफ-१५ लढाऊ विमान उड्डाण करीत असल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले. बायडेन प्रशासनाच्या काळात बॉम्बर विमानाने आखाती क्षेत्रात घातलेली पहिली गस्त असल्याचा दावा लष्करी विश्‍लेषक करीत आहेत. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदावर असताना अमेरिकेने आखातात मोठ्या प्रमाणात बॉम्बर विमानांची तैनाती करून हवाई गस्त घातली होती, याची आठवण लष्करी विश्‍लेषक करून देत आहेत.

इस्रायलच्या लष्कराने या संयुक्त गस्तीबाबत आपली प्रतिक्रिया दिली. या क्षेत्रात इस्रायलचे लष्कर आणि अमेरिकेतील धोरणात्मक सहकार्य कायम असल्याचे या हवाई गस्तीमुळे स्पष्ट होते, असे म्हटले आहे. इस्रायलच्या माध्यमांनीही बी-१बी व एफ-१५ च्या संयुक्त गस्तीची बातमी उचलून धरली. तसेच सदर गस्त ही आण्विक व क्षेपणास्त्र कार्यक्रम राबविणार्‍या इराणसाठी इशारा असल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला.

बी-१बी हे स्ट्रॅटेजिक बॉम्बर विमान म्हणून ओळखले जाते. या विमानांमध्ये अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता होती. पण गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने या विमानांचा वापर केवळ क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठीच केला असून अणुबॉम्ब वाहून नेण्याची यंत्रणा यातून काढून टाकली आहे. तरी देखील अमेरिकेच्या आघाडीच्या तीन बॉम्बर विमानांमध्ये बी-१बीचा समावेश केला जातो. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेच्या हवाईदलाने या बॉम्बर विमानांना हिंदी महासागर क्षेत्रातील दिएगो गार्सिया येथील लष्करी तळावर तैनात केले होते.

दरम्यान, इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अमेरिका व युरोपिय देशांमधून चिंतेचे सूर उमटू लागले आहेत. शनिवारी इटलीची राजधानी रोम येथे सुरू असलेल्या जी२० बैठकीच्या निमित्ताने अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनी जारी केलेल्या निवेदनात इराणच्या अणुकार्यक्रमातील घडामोडींवर तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच इराणने पाश्‍चिमात्यांच्या मागण्यांचे पूर्ण पालन करावे, असे आवाहन यात केले होते. अशा परिस्थितीत, अमेरिकेच्या बॉम्बर विमानाने इराणच्या हवाईहद्दीजवळून घातलेली गस्त लक्षवेधी ठरते.

leave a reply