चीनने पाच भारतीयांची सुटका केली

बीजिंग – गेल्या १२ दिवसांपासून चिनी लष्कराच्या ताब्यात असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या पाच तरुणांना चीनने भारतीय लष्कराकडे सोपविले. शनिवारी किबिधू सीमेवर या पाचही तरुणांच्या हँडओव्हरची कारवाई पार पडली. सुरुवातीला भारताच्या बेपत्ता तरुणांबाबत कुठलीही माहिती नसल्याचा दावा चीनच्या लष्कराने केला होता. पण सदर तरुण गुप्तहेर असल्याचा आरोप करुन चीनने आपले कुटील हेतू दाखवून दिले आहेत.

२ सप्टेंबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या अप्पर सुबानसिरी जिल्ह्यातील सेरा-७ या डोंगरात वनऔषधी शोधत असताना चीनच्या लष्कराने आपल्या पाच साथीदारांचे अपहरण केले. घटनास्थळावरुन पळून जाण्यास यशस्वी ठरलेल्या दोन तरुणांनी ही माहिती दिली. प्राथमिक माहितीच्या आधारावर या पाचही तरुणांचा शोध सुरू झाला होता. भारतीय लष्कराने हॉटलाईनच्या माध्यमातून संपर्क केला आणि यांच्याविषयी माहिती दिली होती. तसेच १८ ते २० वर्षांच्या या तरुणांच्या सुटकेची मागणी भारताने केली होती. पण सुरुवातीला चीनच्या लष्कराने भारतीय तरुण आपल्याकडे नसल्याचे सांगून या प्रकरणाची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता.

पण दोन दिवसांपूर्वीच चीनच्या लष्कराने पाचही तरुण आपल्या ताब्यात असल्याचे सांगितले. त्याबरोबर भारताने राजनैतिक आणि लष्करी स्तरावर या तरुणांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शनिवारी सुमारे दोन तासांच्या कागदोपत्री व्यवहारानंतर चीनच्या लष्कराने या पाचही तरुणांना भारतीय सैनिकांच्या हवाली केले. पण हे तरुण भारतीय लष्कराचे गुप्तहेर असल्याचा आरोप चीनच्या ग्लोबल टाईम्स या मुखपत्राने केला आहे.

leave a reply