चीनने लडाखच्या सीमेवरील लष्करी तैनाती अधिकच वाढविली

-तोडीस तोड तैनाती करुन भारताचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली – लडाखच्या पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडील मोक्याची ठिकाणे भारतीय लष्कराने ताब्यात घेतल्यानंतर अस्वस्थ बनलेल्या चीनने या क्षेत्रात अधिक जवान तैनात केले आहेत. तोफा, रणगाडे तसेच अत्याधुनिक संरक्षण साहित्याची इथली तैनाती वाढवून चीन भारताला भयंकर परिणामांचे इशारे देत आहे. भारतानेही या क्षेत्रात अधिक प्रमाणात रणगाडे तैनात करुन बोफोर्स तोफांचीही तैनाती केल्याच्या बातम्या आहेत. आजवर भारताला बेसावध ठेवून घुसखोरी करणार्‍या चीनवर यापुढे तिळमात्रही विश्वास ठेवता येणार नाही, असे भारताचे माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्लेषक पुन्हापुन्हा बजावत आहेत.

काला टॉप आणि हेल्मेट टॉप इत्यादी टेकड्या बळकाविण्याचे चिनी लष्कराचे मनसुबे उधळून भारतीय सैन्याने या क्षेत्राचा ताबा घेतला आहे. या क्षेत्रात घुसखोरी करण्याचे चीनचे प्रयत्नही भारतीय सैन्य सातत्याने हाणून पाडत आहेत. अशा परिस्थितीत अधिकाधिक तैनाती करुन चीन आपण युद्धाच्या तयारीत असल्याचे दाखवून देत आहे. काही ठिकाणी चीनने बंकर्स तसेच चौक्यांचे बांधकाम सुरू केले आहे. स्पँगूर गॅप मध्ये भारतीय सैन्य व चिनी लष्करामधील अंतर खूपच कमी असल्याचा दावा केला जातो. तसेच या क्षेत्रात दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्या फायरिंग रेंज मध्ये असल्याच्याही बातम्या येत आहेत.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांच्यामध्ये मॉस्को येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले होते. यात उभय देशांमधील चर्चेची प्रक्रिया कायम ठेवण्याच्या निर्णयाचाही समावेश होता. यानुसार शनिवारी भारत व चीनच्या ब्रिगेडिअर्सची चर्चा पार पडली. पण यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. उलट लष्करी तयारीसाठी चीन या चर्चेचा वापर करीत आहे, या आरोपाला यामुळे अधिकच बळ मिळाले आहे. भारताने या चर्चेच्या गुर्‍हाळात न अडकता चीनवरील लष्करी दबाव कायम ठेवावा, अशी मागणी भारताचे मुत्सद्दी तसेच माजी लष्करी अधिकारी करीत आहेत. चीनसारख्या देशाला शांततेची नाही तर बळाचीच भाषा कळते. शांततेसाठी पुढाकार घेणे म्हणजे चीनच्या लेखी कमकुवतपणा ठरतो, हे भारताने कधीही विसरता कामा नये. चीनबरोबर चर्चा करायचीच असेल तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची नीट आखणी झालीच पाहिजे, या मागणीवर भारताने ठाम रहावे, असे आवाहन माजी लष्करी अधिकार्‍यांकडून होत आहे.

चीनने जाणूनबुजून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबतची आपली भूमिका कधीही स्पष्ट केली नाही आणि हळुहळू हा देश भारताच्या अधिकाधिक भूभागावर दावे करु लागला, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत. त्यामुळे आता भारताला चीनच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यापासून दुसरा पर्याय राहिलेला नाही. भारतीय लष्कराच्या आक्रमक भूमिकेमुळे चीनचा सर्वच आघाड्यांवर गोंधळ उडालेला असून चीनचे लष्कर प्रदर्शित करीत असलेली आक्रमकता व तैनाती हा या देशाच्या दबावतंत्राचा भाग असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. चीन भारताबरोबरील युद्धाला घाबरत नसता तर एव्हाना चिनी सैनिकांनी गोळीबार सुरूही केला असता, पण भारताच्या प्रतुत्तराच्या भीतीने चीनने अद्याप ही कारवाई केलेली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास सर्वच प्रमुख देश भारताच्या बाजूने उभे आहेत. त्याचवेळी कोरोनाची निर्यात करून जगभरातील लाखो जणांचा बळी घेणार्‍या चीनविरोधात जगात संतापाची भावना आहे.

हाँगकाँग, तैवान, तिबेट आणि साऊथ चायना सी या सर्वच आघाड्यांवर चीन एकाकी पडला आहे. अशा परिस्थितीत भारताबरोबर संघर्ष छेडण्याचा निर्णय चीनने घेतलाच तर तो चीनसाठी आत्मघातकी निर्णय ठरेल, असे सामरिक विश्लेषक लक्षात आणून देत आहेत. अशारितीने आपली कोंडी झालेली असताना चीनची कम्युनिस्ट राजवट आपल्या सरकारी मुखपत्राचा वापर करुन भारताला इशारे व धमक्या देत आहे. पण कोरोनाव्हायरसची साथ, अमेरिकेबरोबरचे व्यापारयुद्ध, घसरती अर्थव्यवस्था यामुळे चीन बेजार झाल्याचे जगभरातील तटस्थ विश्लेषक व अभ्यासकांचे म्हणणे आहे. अशा आव्हानात्मक काळात एकाचवेळी आपल्या सर्वच शेजारी देशांबरोबर सीमावाद छेडून चीनने आपलीच कोंडी करुन घेतली आहे, आणि इतक्यात ही कोंडी फुटणे शक्य नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

leave a reply