गलवान खोर्‍यात हल्ला चढवून चीनने भारताचा विश्‍वास गमावला आहे

- लेफ्टनंट जनरल अनिल चौहान

नवी दिल्ली – गलवान खोर्‍यात भारतीय सैनिकांवर हल्ला चढवून चीनने भारताचा विश्‍वास पूर्णपणे गमावलेला आहे, असे ईस्टर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी म्हटले आहे. गलवानमधील या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी चकमक झालेली नाही. पण या क्षेत्रात स्थैर्य प्रस्थापित होण्यासाठी आणखी बराच काळ लागू शकतो, असे ले. जनरल चौहान यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून भारताचे लष्करी अधिकारी लडाखच्या एलएसीवरील तणाव इतक्यात निवळणार नसल्याचे सांगून चीनवरील दडपण अधिकच वाढवित असल्याचे दिसत आहे.

भारताचा विश्‍वास

गलवानच्या खोर्‍यात चीनने चढविलेल्या त्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या लष्करामध्ये चकमक झाली नाही की घुसखोरीचे विशेष नोंद घेण्याजोगे प्रयत्नही झालेले नाही. मात्र गलवानच्या खोर्‍यात चीनने चढविलेल्या त्या हल्ल्यानंतर चीनने भारताचा विश्‍वास पूर्णपणे गमावलेला आहे. इथली परिस्थिती सध्या तणावपूर्ण असून ती पूर्वपदावर येण्यासाठी बराच काळ जावा लागेल, असे ले. जनरल चौहान यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथे ‘नॅशनल वॉर मेमोरियल’मध्ये ले. जनरल चौहान बोलत होते. गलवानच्या संघर्षानंतर चीनने या क्षेत्रानजिक मोठ्या प्रमाणात जवान तैनात केले होते. आता त्यामध्ये कपात होऊ लागल्याची नोंद ले. जनरल चौहान यांनी केली.

असे असले तरी, कडक हिवाळ्यातही देशाच्या सीमेचे संरक्षण करण्याची पूर्ण तयारी भारतीय लष्कराने केलेली आहे, अशी ग्वाही ले. जनरल चौहान यांनी दिली. लडाखच्या कडक हिवाळ्यात चीनचे जवान कुडकुडत आहेत. त्यांना इथल्या हवामानाचा भयंकर त्रास होत असल्याने दैनंदिन पातळीवर जवान तैनात करून एकाच दिवसात त्यांना मागे बोलावण्याची कसरत चीनच्या लष्कराला करावी लागत आहे. त्यामुळे चीनचे जवान भारतीय सैनिकांशी लढणे दूरच राहिले, इथे तग धरून देखील राहू शकत नाही, असा दावा करण्यात येत आहे. अशा परिस्थितीतही चीनचे लष्कर माघार घेण्यास तयार नाही, याचे कारण त्यांना चीनच्या नेतृत्त्वाकडून तसे आदेश मिळालेले आहेत, अशी माहिती काही विश्‍लेषकांनी उघड केली.

लडाखमधील कडाक्याच्या थंडीत चीनचे जवान गोठल्याच्या बातम्या भारतीय माध्यमांकडून दिल्या जात आहेत. पण चीनच्या जवानांसमोरील या समस्या मांडून भारतीय सैनिकांचे लडाखमधील प्रश्‍न सुटणार नाहीत, असा शेरा चीनचे सरकारी दैनिक ग्लोबल टाईम्सने मारला आहे. मात्र पाश्‍चिमात्य तसेच भारतीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या बातम्यांमुळे लडाखमधील चिनी जवानांची तैनाती हा या देशाच्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. यामुळेच चीनचे नेते आपल्या लष्कराला इथून माघारीचे आदेश द्यायला तयार नाहीत, असे काही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

भारताच्या सैन्यासमोर चिनी लष्कर लडाखच्या हवामानात टिकाव धरू शकले नाहीत, म्हणून चीनला इथून माघार घ्यावी लागली, अशी नामुष्की ओढावेल, या चिंतेने चीनच्या नेत्यांना ग्रासले आहे. म्हणूनच नजिकच्या काळात चीन इथून आपले जवान माघारी घेण्याची शक्यता नाही. चीनचा या स्थितीचा भारताने पुरेपूर लाभ घ्यावा व सीमावादाबाबतची आपली भूमिका अत्यंत कणखरतेने मांडावी, असा सल्ला भारताचे माजी लष्करी अधिकारी देत आहेत.

भारतीय सैन्याला लडाख किंवा त्याहूनही अधिक कडक हिवाळा असलेल्या सियाचीनमध्ये जागता पहारा देण्याची सवय आहे. या अनुभवाचा वापर करून भारतीय सैनिक लडाखमध्ये सहजतेने वावरू शकतात. पण एलएसी ओलांडण्यासाठी पुढे सरसावण्याचा प्रयत्न करणार्‍या चिनी जवानांचे तसे नाही. म्हणूनच भारताने सीमावादावरील चर्चेतून चीनला पळवाट मिळणार नाही, याची पुरती दक्षता घ्यावी, असे या माजी लष्करी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

लडाखच्या एलएसीवर होत असलेल्या आपल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी व प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी चीन इतर आघाड्यांवर भारताला आव्हान देऊ शकतो, याचीही जाणीव भारतीय संरक्षणदलांना असून चीनच्या सर्वच हालचालींवर भारतीय संरक्षणदलांची करडी नजर रोखलेली असल्याचे इशारे सेनादलाच्या अधिकार्‍यांकडून दिले जात आहेत.

leave a reply