सेंकाकू द्विपसमुहावर जपानचाच अधिकार

-जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी चीनला फटकारले

टोकिओ – ‘ईस्ट चायना सी’मधील सेंकाकू द्विपसमुहांच्या हद्दीत चीनच्या जहाजांची घुसखोरी आणि त्याबाबत चीन देत असलेले खुलासे कधीही खपवून घेणार नाही. या द्विपसमुहांवर जपानचाच अधिकार आहे. चीनने या द्विपसमुहांच्या हद्दीतील आपल्या एकतर्फी कारवाया देखील बंद कराव्या, अशा खणखणीत शब्दात जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी चीनला फटकारले.

सेंकाकू

जपानचे नवनियुक्त संरक्षणमंत्री किशी यांनी चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंघे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. दीड तासाहून अधिक काळ चाललेल्या या चर्चेत जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी सेंकाकू द्विपसमुहांचा मुद्दा आणि जपानच्या सागरी हद्दीतील घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला. सेंकाकू द्विपसमुहाच्या हद्दीतील चीनच्या जहाजांच्या घुसखोरीबद्दल जपान गंभीर असल्याचे संरक्षणमंत्री किशी यांनी स्पष्ट केले.

सेंकाकू

जपानच्या सागरी क्षेत्रात एकतर्फी हालचाली करून येथील स्थिती बदलण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न चीनने त्वरीत बंद करावे, असे आवाहन जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी केले.

‘ऐतिहासिकरित्या आणि आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे सेंकाकू द्विपसमुहांवर निर्विवादपणे जपानचाच अधिकार आहे’, असे संरक्षणमंत्री किशी यांनी या बैठकीत ठणकावून सांगितले. त्याचबरोबर जपानच्या या द्विपसमुहाच्या हद्दीत चिनी नौका आणि विनाशिकांनी किती व कधी घुसखोरी केल्या याची यादीच संरक्षणमंत्री किशी यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांसमोर वाचून दाखविली. चीनने वेळीच आपल्या या कारवाया रोखाव्या, असे किशी यांनी यावेळी बजावले.

सेंकाकू

यानंतर चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी सदर घुसखोरींबाबत खुलासा दिला. पण चिनी जहाजांच्या जपानच्या हद्दीतील घुसखोरी कुठल्याही प्रकारे मान्य केली जाणार नसल्याचे किशी यांनी स्पष्ट केले. या व्यतिरिक्त जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी ‘साऊथ चायना सी’चा मुद्दाही उपस्थित केला. चीनने ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्राचे लष्करीकरण थांबवावे. तसेच आपल्या लष्करी सामर्थ्याबाबत चीनने अधिक पारदर्शकता दाखवावी, असे आवाहन जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी केले.

दरम्यान, भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेण्याच्या तयारीत असताना, चीनने सेंकाकूमधील आपल्या हालचाली वाढविण्यास सुरुवात केल्याचा दावा जपानमधील वृत्तसंस्थेने केला आहे.

leave a reply