येत्या वर्षभराच्या कालावधीत भारताचे ‘मेरिटाईम थिएटर कमांड’ कार्यरत होणार

नवी दिल्ली – भारताच्या साडेसात हजार किलोमीटर लांबीच्या सागरी किनार्‍यासह संपूर्ण सागरी क्षेत्राची जबाबदारी असणारे ‘मेरिटाईम थिएटर कमांड’ पुढील वर्षात सक्रिय होईल. गेल्या काही वर्षात संरक्षणदलांची युद्धक्षमता वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना सुरू असून ‘मेरिटाईम थिएटर कमांड’ हा त्यातील निर्णायक टप्पा मानला जातो. या कमांडच्या स्थापनेनंतर भारताच्या पूर्व व पश्‍चिम अशा दोन्ही बाजूंच्या आरमारांसह, नौदलाची लढाऊ विमाने, लष्कराच्या दोन ‘अ‍ॅम्फिबियस इन्फ्रंट्री ब्रिगेड्स’ व तटरक्षक दलावर कमांडच्या प्रमुखांचे नियंत्रण राहणार आहे.

‘मेरिटाईम थिएटर कमांड’

गेल्या काही वर्षात चीनचे नौदल हे जगातील सर्वात मोठे नौदल म्हणून समोर आले आहे. या नौदलाच्या बळावर चीन हिंदी महासागर क्षेत्रात सातत्याने हालचाली करीत आहे. चिनी पाणबुड्या, विनाशिका व युद्धनौकांचा या क्षेत्रातील वावर भारताच्या सुरक्षेला आव्हान देण्यासाठीच असल्याचे सामरिक विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. याद्वारे भारताची आपल्याच सागरी क्षेत्रामध्ये कोंडी करण्याची व्यूहरचना चीनने आखलेली आहे. यामुळे भारत इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेसाठी आपले योगदान देऊ शकणार नाही व आपल्या क्षमतेचा वापर करू शकणार नाही, असा चीनचा तर्क आहे. ही बाब लक्षात घेऊन भारताने आपल्या नौदलाची क्षमता वाढविण्यासाठी झपाट्याने पावले उचलली आहेत.

यानुसार भारताने ‘मेरिटाईम थिएटर कमांड’च्या संकल्पनेवर काम सुरू केले होते. याचा अंतीम आराखडा येत्या काही दिवसात सरकारसमोर सादर केला जाईल. याला लवकरच मान्यता मिळेल व ‘मेरिटाईम थिएटर कमांड’चे काम पुढील वर्षभरात सुरू होईल, असे दावे केले जातात. याचे मुख्यालय कर्नाटक राज्याच्या कारवारमधील नौदलाच्या तळावरच असेल. व्हाईस अ‍ॅडमिरल दर्जाचा अधिकारी या ‘मेरिटाईम थिएटर कमांड’चा प्रमुख असेल, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे भारताची सागरी सुरक्षा अधिकच सुनिश्‍चित होणार आहे. चीन भारतासह इतर देशांच्या सागरी सुरक्षेला आव्हान देण्यासाठी वापर करीत असलेल्या डावपेचांना अधिक प्रभावीपणे तोंड देणे यामुळे शक्य होऊ शकेल.

याआधी देशाच्या तिन्ही संरक्षणदलांच्या केवळ दोन संयुक्त ‘कमांड’ कार्यरत आहेत. यामध्ये अंदमान व निकोबार कमांड आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडचा समावेश आहे. याच्या व्यतिरिक्त तिन्ही संरक्षणदलांची मिळून १७ कमांड सध्या कार्यरत आहेत. लष्करी मोहीम राबविण्यापासून इतर आवश्यक कारवायांच्या आखणीमध्ये तसेच समन्वयात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन ‘मेरिटाईम थिएटर कमांड’ची स्थापना करण्यात आल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

आपल्या विरोधात खडे ठाकणार्‍या साऊथ चायना सी तसेच इतर क्षेत्रातील देशांना दहशतीखाली ठेवण्यासाठी चीन आपल्या मच्छिमार जहाजांचा वापर करीत आहे. शेकडोंच्या संख्येने चीनची मच्छिमार जहाजे वादग्रस्त सागरी क्षेत्रात शिरकाव करून त्या देशाच्या सागरी सुरक्षेला आव्हान देत असल्याच्या घटना याआधी समोर आल्या आहेत. ही मच्छिमार जहाजे म्हणजे चिनी नौदलाची पथकेच असल्याचे आरोप काही देशांनी केले होते. भारताच्या विरोधातही चीन याचा वापर करू शकतो, अशी दाट शक्यता वर्तविण्यात येते. चीनची ही कारस्थाने हाणून पाडण्यासाठी भारताने तयारी केली असून हिंदी महासागर क्षेत्रात वावरणार्‍या प्रत्येक जहाजाची नोंद भारतीय नौदलाकडून तसेच तटरक्षक दलाकडून केली जात आहे.

चीनच्या नौदलात मोठ्या प्रमाणात पाणबुड्यांचा भरणा आहे. ही बाब लक्षात घेऊन भारतीय नौदलासाठी पाणबुडीभेदी विनाशिकांची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे पाणबुड्यांचा वापर करून भारताच्या सागरी प्रभावाला आव्हान देण्याचे चीनचे प्रयत्न हाणून पाडण्याचीही भारताने तयारी केल्याचे उघड होत आहे. नजिकच्या काळात चीन मलाक्काच्या आखातातून होणार्‍या आपल्या सागरी वाहतुकीच्या सुरक्षेसाठी अधिक युद्धनौका तैनात करून भारतावरील दडपण वाढवू पाहत होता. पण चीनपेक्षाही अधिक प्रमाणात युद्धनौका तैनात करून भारताने मलाक्काच्या आखतातील चीनचे हे डावपेच उधळून लावले आहेत.

leave a reply