उघुरवंशियांच्या मानवाधिकारांचा मुद्दा मांडणार्‍या ब्रिटीश संसद सदस्य व अभ्यासगटांवर चीनचे निर्बंध

लंडन/बीजिंग – झिंजिआंगमधील उघुरवंशियांच्या वंशसंहाराबाबत आवाज उठविणार्‍या ब्रिटीश संसद सदस्यांसह अभ्यासगटांवर चीनने निर्बंधांची घोषणा केली आहे. चीनच्या या निर्बंधांवर ब्रिटनकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटली असून, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्याला ब्रिटीश संसद सदस्यांचा अभिमान असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे. चीनकडून मानवाधिकारांवर बोलणार्‍यांविरोधात सुरू असलेल्या दडपशाहीचा ब्रिटन तीव्र निषेध करतो, असे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी बजावले.

काही दिवसांपूर्वी अमेरिका, युरोपिय महासंघ व ऑस्ट्रेलियासह ब्रिटनने उघुरवंशियांच्या मुद्यावर चीनविरोधात कारवाईची घोषणा केली होती. अमेरिका व मित्रदेशांनी एकत्रितरित्या केलेल्या या कारवाईने चीनच्या सत्ताधार्‍यांना जबरदस्त झटका बसला होता. बिथरलेल्या चीनने आता प्रत्युत्तरादाखल ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून ब्रिटनमधील संसद सदस्य व अभ्यासगटांवर लादलेले निर्बंध त्याचाच भाग ठरतो.

‘ब्रिटनमधील काही व्यक्ती व गट आकसाने चीनबद्दल असत्य व चुकीची माहिती पसरवित आहेत. ही बाब आंतरराष्ट्रीय कायदा व आंतरराष्ट्रीय संबंधांशी निगडीत नियमांचे उल्लंघन ठरते’, असा आरोप करून चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने निर्बंधांची घोषणा केली आहे. त्याचवेळी ब्रिटनने खोट्या माहितीवर आधारीत निर्बंध लादल्याने बचावासाठी चीनला कारवाई करावी लागली, असा दावाही परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी केला आहे.

चीनने निर्बंध लादलेल्यांच्या यादीत ब्रिटनमधील संसद सदस्य सर इयान डंकन स्मिथ, टॉम ट्युगेंडहॅट, नील ओब्रायन, टिम लॉटन व नुसरत गनी यांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त लॉर्ड डेव्हिड ऍल्टन, बॅरोनेस हेलेना केनेडी, जो स्मिथ फिन्ले व वरिष्ठ कायदेतज्ज्ञ सर जॉफ्रि नाईस यांनाही निर्बंधांचे लक्ष्य करण्यात आले आहे. या नऊजणांव्यतिरिक्त ‘चायना रिसर्च ग्रुप’ हा अभ्यासगट तसेच ‘कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी ह्युमन राईट्स कमिशन’, ‘उघुर ट्रिब्युनल’ व ‘इसेक्स कोर्ट चेंबर्स’ यांच्यावरही निर्बंध लादण्यात आले आहेत.

सर इयान डंकन स्मिथ यांनी, चीनने लादलेले निर्बंध आपण सन्मानचिन्ह म्हणून गौरवाने मिरवणार असल्याचा सणसणीत टोला लगावला आहे. तर नुसरत गनी यांनी आपण कोणत्याही दडपणापुढे झुकणार नाही व आपला आवाज कोणीही दाबू शकणार नाही, असे बजावले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी, चीनच्या निर्बंधांवर आक्रमक प्रतिक्रिया नोंदविताना आपण सर्व संसद सदस्यांबरोबर ठामपणे उभे असल्याचे बजावले. उघुरांविरोधात सुरू असणार्‍या मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या मुद्यावर बोलणारे ब्रिटनचे संसद सदस्य व इतर जण हे ‘शायनिंग लाईट’ असल्याची प्रशंसाही पंतप्रधान जॉन्सन यांनी केली.

चीनने लादलेल्या या निर्बंधांमुळे ब्रिटन व चीनमधील तणाव चांगलाच चिघळल्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गेल्या वर्षभरात सातत्याने चीनच्या कारवायांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून त्यात हॉंगकॉंग, साऊथ चायना सीमधील कारवाया, तैवान, ५जी, सायबरयुद्ध यासारख्या मुद्यांचा समावेश आहे. चीनच्या सत्ताधारी राजवटीने या मुद्यावरून वारंवार ब्रिटनला धमकावले असले, तरी त्यानंतरही ब्रिटनने आपली भूमिका बदललेली नाही.

leave a reply