चीनबरोबरील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर तैवानकडून ‘लॉंग रेंज मिसाईल’चे उत्पादन सुरू

तैपेई – काही दिवसांपूर्वीच चीनने युद्धाची तयारी केल्याचा दावा करणार्‍या तैवानने आपली सज्जता व क्षमताही वाढविण्यास सुरुवात केली आहे. तैवानने स्वदेशी बनावटीच्या ‘लॉंग रेंज मिसाईल’ची मोठ्या प्रमाणात निर्मिती सुरू केल्याची माहिती तैवानचे संरक्षणमंत्री चिऊ कुओ-शेंग यांनी दिली. तैवानने तीन नवी स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे विकसित करण्याच्या हालचालींना वेग दिल्याचेही सांगण्यात आले आहे. त्याचवेळी तैवानची सागरी हद्द सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिकेच्या तटरक्षकदलाबरोबर लवकरच सहकार्य करार करण्यात येईल, अशी माहिती तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून देण्यात आली आहे.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर चीनच्या ‘साउथ चायना सी’मधील हालचाली अधिक आक्रमक झाल्या आहेत. तैवानच्या नजिकच्या क्षेत्रात एकापाठोपाठ युद्धसराव आयोजित करणार्‍या चीनने इतर देशांवरही दडपण आणण्यास सुरुवात केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे प्रमुख ऍडमिरल फिलिप डेव्हिडसन यांनी संसदेसमोर झालेल्या सुनावणीतही, चीनच्या वाढत्या धोक्याची जाणीव करून दिली होती. येत्या सहा वर्षात चीन तैवानवर हल्ला करू शकतो असेही ऍडमिरल डेव्हिडसन यांनी त्यात बजावले होते.

तैवान सरकारने या घटना अतिशय गांभीर्याने घेतल्या असून आपली युद्धसज्जता तसेच क्षमता वाढविण्यासाठी मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. साऊथ चायना सी क्षेत्रातील पॅरासेल आयलंड क्षेत्रात असलेल्या ‘इटु अबा’ या बेटावरील संरक्षण तैनाती वाढविल्याचे तैवानकडून नुकतेच सांगण्यात आले होते. मात्र तैवानकडे असणारी शस्त्रसामुग्री चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी अपुरी असल्याचे दावे अनेक विश्‍लेषक व आजीमाजी अधिकार्‍यांकडून करण्यात येतात.

या पार्श्‍वभूमीवर तैवानने अमेरिकेकडून शस्त्रखरेदीचा वेग वाढवितानाच स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान, पाणबुडी, युद्धनौका तसेच क्षेपणास्त्रे विकसित करण्यावरही भर दिला आहे. गुरुवारी संरक्षणमंत्री कुओ-शेंग यांनी दिलेली माहिती त्याचाच भाग ठरतो. तैवानच्या ‘नॅशनल चुंग-शॅन इन्स्टिट्यूट ऍफ सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी’कडून स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे विकसित करण्यात येत आहेत. त्यातील एका ‘लॉंग रेंज मिसाईल’चे उत्पादनही सुरू झाल्याची माहिती संरक्षणमंत्र्यांनी संसदेत दिली.

त्याव्यतिरिक्त तीन स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांचा विकास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी तैवानच्या संरक्षण विभागाकडून ‘हाय प्रिसिजन मोबाईल एअर डिफेन्स वेपन्स’च्या निर्मितीवरही भर देण्यात येईल, अशी ग्वाही संरक्षणमंत्री कुओ-शेंग यांनी दिली. चीनच्या हल्ल्याचा विचार करता, ‘फार स्ट्राईक कॅपॅबिलिटी’ हा घटक तैवानसाठी महत्त्वाचा ठरेल, असे तैवानच्या संरक्षण विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या अहवालात सांगण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर संरक्षणमंत्र्यांनी दिलेली माहिती महत्त्वाची ठरते.

दरम्यान, चीनकडून तैवानच्या सागरी हद्दीत सुरू असणारी वाढती घुसखोरी रोखण्यासाठी तैवानने अमेरिकेबरोबरील सहकार्य अधिक वाढविण्याचे संकेत दिले आहेत. नजिकच्या काळात अमेरिका व तैवानच्या तटरक्षकदलांमध्ये सहकार्य करारावर स्वाक्षर्‍या होतील, अशी माहिती तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वु यांनी दिली.

leave a reply