अमेरिकेचे नौदल पाणबुडीतून प्रक्षेपित केल्या जाणार्‍या ड्रोन्सनी सज्ज होणार

वॉशिंग्टन – अमेरिकेचे नौदल १२० टेहळणी ड्रोनने सज्ज होत आहे. सदर ड्रोन्स पाणबुडीतून प्रक्षेपित केले जातील व यामुळे नौदलाच्या क्षमतेत वाढ होईल, असा दावा अमेरिकेच्या लष्करी विश्‍लेषकांकडून केला जातो. पुढील दोन वर्षात अमेरिकेचे नौदल या ड्रोन्सनी सज्ज होईल, असे बोलले जाते.

अमेरिकन नौदलाच्या सिस्टिम कमांडने ड्रोन निर्मिती करणार्‍या ‘एरोविरॉंमेंट’ने या अमेरिकन कंपनीकडे १२० ड्रोन्सच्या खरेदीसाठी विचारणा केली आहे. अमेरिकन नौदल एरोविरॉमेंटकडून हेरगिरीसाठी लागणारे ‘ब्लॅकविंग १०सी’ ड्रोन्स खरेदी करणार आहे. यासंबंधी नौदल आणि सदर कंपनीमध्ये चर्चा सुरू असून येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत पहिले ड्रोन अमेरिकन पाणबुड्यांवर सज्ज असेल. तर पुढील दोन वर्षांमध्ये अमेरिकी पाणबुड्या ब्लॅकविंगने पूर्णपणे सज्ज असतील, असा दावा केला जातो.

पाणबुडीच्या लॉंचिंग ट्यूबमध्ये प्रक्षेपित केले जाणारे सदर ड्रोन २७ इंच रूंद आहे तर याचे वजन फक्त १.८१ किलोग्रॅम इतके आहे. ड्रोन प्रक्षेपित करण्यासाठी पाणबुडीला पाण्याच्या पृष्ठभागाशी येण्याची गरज नाही. समुद्राच्या तळाशी राहूनही पाणबुडीतून ड्रोन प्रक्षेपित केले जाऊ शकते. इलेक्ट्रो-ऑप्टीकल आणि इंफ्रारेड सेंसरनी सज्ज असलेल्या ब्लॅकविंगमुळे अतिशय वेगाने माहितीची देवाणघेवाण होते, असा दावा केला जातो.

आकाराला लहान आणि पाण्याखालून प्रक्षेपित केल्यामुळे या ड्रोन्सना रडारवर शोधणे अवघड होऊ शकते, असा दावा विश्‍लेषक करीत आहेत. त्यातच नौदलाच्या पाणबुड्यांप्रमाणे ड्रोन पाणबुड्यांमधूनही ब्लॅकविंग प्रक्षेपित केले जाऊ शकते. त्यामुळे अमेरिकी नौदलाच्या क्षमतेत प्रचंड वाढ होणार आहे.

पाणबुडीतून टेहळणी ड्रोन प्रक्षेपित करण्याच्या योजनेवर अमेरिकेचे नौदल २०१३ सालापासून काम करीत आहे. गेल्या काही वर्षांच्या प्रयोगानंतर २०१९ ते २०२० या दोन वर्षांच्या कालावधीत ब्लॅकविंगची कसून चाचणी घेण्यात आली. यासाठी युएसएस ऍनापोलीस या पाणबुडीचा वापर करण्यात आला होता. या चाचणीनंतरच सदर ड्रोन नौदलात सामील करून घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

याशिवाय अमेरिकेचे नौदल मानवरहित पाणबुडी तसेच मानवरहित युद्धनौकेतून स्वार्म ड्रोन्स प्रक्षेपित करण्यावरही वेगाने हालचाली करीत आहे. यासाठी अमेरिकेच्या नौदलाने रेदॉन कंपनीबरोबर तीन कोटी डॉलर्सहून अधिक किंमतीचा करार केल्याचा दावा केला जातो. यासाठी रेदॉनच्या कोयोटे या ड्रोन्सच्या आवृत्तींची निवड झाल्याचे बोलले जाते.

दरम्यान, चीनने याआधी सागरी ड्रोन्सच्या क्षेत्रात वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. यातील काही ड्रोन्स चीनने आपल्या लष्करी संचलनात प्रदर्शित केले होते. तर हिंदी महासागर क्षेत्रातही चीन सागरी ड्रोन्स तैनात करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी इंडोनेशियाच्या मच्छिमारांनी चिनी ड्रोन्स पकडल्याची माहिती उघड झाली होती. तसेच चीनने आपल्या सागरी हद्दीत स्वार्म ड्रोन्सची चाचणीही घेतली होती.

leave a reply