उघूरवंशियांवरील अमानवी अत्याचार व अफगाणिस्तानच्या खनिजसंपत्तीची लूट करणाऱ्या चीनचे अफगाणिस्तानातील हितसंबंध ‘आयएस’च्या निशाण्यावर

- आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेचा दावा

अमानवीकाबुल – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून उघूरवंशिय इस्लामधर्मियांवर सुरू असलेल्या अमानवी अत्याचाराचे पडसाद अफगाणिस्तानात उमटू लागले आहेत. गेल्या दीड वर्षात चीनने अफगाणिस्तानात केलेली गुंतवणूक ‘आयएस-खोरासान’च्या हल्ल्यांचे लक्ष्य बनली आहे. चीनने उघूरवंशियांना दिलेल्या वागणुकीवर आयएसकडून ही प्रतिक्रिया उमटत आहे. पण त्याचबरोबर अफगाणिस्तानातील दुर्मिळ खनिजसंपत्तीवर डल्ला मारण्याच्या तयारीत असलेल्या चीनला आयएस व इतर दहशतवादी संघटना इशारा देत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने केला आहे.

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘चायनाज्‌‍ झिंजियांग सेंट्रल एशिया पेट्रोलियम अँड गॅस’ या चिनी कंपनीने अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीबरोबर 25 वर्षांसाठी इंधनविषयक करार केला होता. अफगाणिस्तानच्या वायव्येकडील अमू नदीच्या खोऱ्यातील इंधन क्षेत्रासंबंधीचा हा करार होता. तर राजधानी काबुलजवळील मेस अयनाक येथील तांब्याच्या खाण प्रकल्पातील उत्खननासंबंधीच्या कराराचा देखील समावेश होता. यासाठी चीनने तब्बल 54 कोटी डॉलर्सच्या गुंतवणूकीची घोषणा केली होती.

पण चीनची अफगाणिस्तानातील गुंतवणूक सुरक्षित राहणार नसल्याचा इशारा ‘आयएस’ने आपल्या मुखपत्रातून गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच दिला होता. झिंजियांगप्रमाणे अफगाणिस्तानातही आपण साम्राज्यवादाचा विस्तार करू, असे दिवास्वप्न चीन पाहत असेल. पण अफगाणिस्तानातील इस्लामधर्मियांच्या खनिजसंपत्तीची लूट करणाऱ्या आणि उघूरवंशियांचा छळ करणाऱ्या चीनला याची किंमत मोजावी लागेल, अशी धमकी आयएसने दिली होती, याकडे ‘निके एशिया’ या वृत्तसंस्थेने लक्ष वेधले.

त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून अफगाणिस्तानातील चीनच्या गुंतवणुकीवर तसेच हितसंबंधांवरील हल्ले वाढल्याचे या वृत्तसंस्थेने लक्षात आणून दिले. डिसेंबर महिन्यातच आयएसच्या दहशतवाद्यांनी चिनी व्यापारी, गुंतवणूकदार, अधिकाऱ्यांच्या वर्दळीसाठी प्रसिद्ध असलेल्या काबुलमधील हॉटेलवर मोठा हल्ला चढविला हता. यामध्ये पाच चिनी नागरिक गंभीर जखमी झाले होते. अफगाणिस्तानातील आपल्या नागरिकांवरील वाढत्या हल्ल्यांनंतर चीनच्या राजदूताने तालिबानच्या वरिष्ठ कमांडरची भेट घेऊन चिनी नागरिकांना सुरक्षा पुरविण्याची मागणी केली होती, याची आठवण सदर वृत्तसंस्थेने करुन दिली.

दरम्यान, आयएसच्या वाढत्या हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन चीनने अफगाणिस्तानला जोडणाऱ्या काशगर कॉरिडॉरची सुरक्षा वाढविली आहे. या सीमेद्वारे आयएसचे दहशतवादी चीनमध्ये घुसखोरी करून हल्ले चढवतील, अशी चिंता चीनला सतावित आहे.

English हिंदी

leave a reply