इराक-सिरिया सीमेजवळ नवा ड्रोन हल्ला

- तीन जण ठार

ड्रोन हल्लाबैरुत – सलग दुसऱ्या दिवशी इराक-सिरियाच्या सीमेजवळ ड्रोन हल्ला झाला. इराणसंलग्न दहशतवाद्यांच्या ट्रकवर झालेल्या या हल्ल्यात तीन जण ठार झाले. यामध्ये इराणसंलग्न संघटनेच्या वरिष्ठ कमांडरचा समावेश होता, असा दावा ब्रिटनस्थित सिरियन मानवाधिकार संघटनेने केला आहे. याबरोबर गेल्या चोवीस तासात सदर भागात झालेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये एकूण 10 जण ठार झाले आहेत.

रविवारी रात्री इराकमधून सिरियाच्या हद्दीत अबुकमल शहरात दाखल झालेल्या ट्रक्सवर भीषण ड्रोन हल्ले झाले होते. सात ट्रक्स स्फोटानंतरच्या आगीत राख झाल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला होता. सिरियन सरकारने या हल्ल्यात जीवितहानी झाली नसल्याचे म्हटले होते. पण यामध्ये सात जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच सदर ट्रक्स इराणसंलग्न दहशतवादी संघटनांसाठी सहाय्य घेऊन जात होते, असा आरोपही तीव्र होत आहे.

याला चोवीस तासही उलटत नाही तोच सोमवारी रात्री पुन्हा एकदा याच भागात आणखी एक ड्रोन हल्ला झाला. यामध्ये तीन जण ठार झाले असून इराणसंलग्न दहशतवादी संघटनेचा कमांडर यात मारला गेल्याचा दावा सिरियन मानवाधिकार संघटनेने केला. या हल्ल्यात पेट घेतलेल्या वाहनाचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. या दोन्ही ड्रोन हल्ल्यांसाठी इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. अमेरिकेचा लष्करी तळ देखील सिरियाच्या याच भागात आहे, याकडेही आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्ष वेधत आहेत.

हिंदी

leave a reply