चीनने हल्ला चढविलाच तर तैवान अखेरपर्यंत लढेल

- तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांची घोषणा

तैपेई – चीन लवकरच तैवानचा ताबा घेण्यासाठी हल्ला चढवू शकतो, अशी शक्यता अमेरिकेचे लष्करी अधिकारी व्यक्त करीत आहेत. या क्षेत्रातील चीनच्या लष्करी हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकी अधिकारी हा दावा करीत आहेत. याची दखल तैवानने घेतली असून चीनच्या या हल्ल्याविरोधात आपला देश सज्ज असल्याचे तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी म्हटले आहे. चीनने हल्ला चढविलाच तर आपला देश अखेरपर्यंत चीनशी लढेल, तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले आहे.

Advertisement

काही तासांपूर्वीच चीनची ‘लिओनिंग’ विमानवाहू युद्धनौका पाच विनाशिकांसह तैवानच्या आखाताजवळ दाखल झाली आहे. चिनी युद्धनौकांनी या क्षेत्रात युद्धसराव सुरू केला असून यापुढेही नियमितपणे अशाप्रकारचा सराव केला जाईल, अशी घोषणा चीनने केली आहे. चीनच्या युद्धनौकेचा तैवानच्या आखाताजवळील हा सराव म्हणजे तैवानसाठी इशारा असल्याचा दावा केला जातो. तैवानबाबत चीनने स्वीकारलेल्या आक्रमक हालचालींवर अमेरिकी लष्करी अधिकारी व विश्‍लेषक चिंता व्यक्त करीत आहेत.

अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे प्रमुख ऍडमिरल फिल डेव्हिडसन यांनी महिन्याभरापूर्वी अमेरिकन कॉंग्रेसला सुपूर्द केलेल्या अहवालात चीनच्या इराद्यांबाबत इशारा दिला होता. पुढील सहा वर्षांमध्ये चीन तैवानचा घास गिळण्यासाठी प्रयत्न करू शकतो, असा दावा ऍडमिरल डेव्हिडसन यांनी केला होता. तर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झालेले ऍडमिरल जॉन ऍक्विलिनो यांनी सिनेटसमोर बोलताना, सहा वर्षांहून कमी कालावधीत चीन तैवानबाबत अशी आगळीक करू शकतो, अशी चिंता व्यक्त केली होती. तर तैवानच्या हवाई व सागरी हद्दीतील चिनी विमाने व जहाजांच्या घुसखोरी ही देखील चिंतेची बाब असल्याचे काही अमेरिकी अधिकार्‍यांनी म्हटले होते.

तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी चीनच्या युद्धनौकांचा सदर सराव व अमेरिकी अधिकार्‍यांकडून व्यक्त केल्या जाणार्‍या चिंतेवर आपल्या देशाची भूमिका मांडली. ‘तैवानच्या विरोधातील चीनच्या हल्ल्याची शक्यता धोकादायक स्तरावर पोहोचली आहे, एवढे अमेरिकी अधिकार्‍यांच्या बोलण्यातून समोर येत आहे. तसेच असेल तर, चीनच्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी तैवान सज्ज आहे. तैवानच्या सुरक्षेसाठी अखेरच्या दिवसापर्यंत लढा द्यावा लागला तरी आम्ही तो लढा देऊ’, अशी घोषणा परराष्ट्रमंत्री वू यांनी केली. यासाठी तैवान आपल्या लष्करी सामर्थ्यात व त्यावरील खर्चात वाढ करण्यासाठी तयार असल्याचे तैवानचे परराष्ट्रमंत्री म्हणाले.

दरम्यान, चीनबरोबरील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, तैवानने काही दिवसांपूर्वीच दिर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची मोठ्या प्रमाणात निर्मिती सुरू केली होती. तसेच दोन आठवड्यानंतर तैवानने युद्धसरावाचे आयोजन केले आहे. चीनने हल्ला चढविलाच तर त्याचा सामना करण्याची तयारी तैवान या युद्धसरावाद्वारे करणार आहे.

leave a reply