रशियन विनाशिकेवरुन दिर्घ पल्ल्याच्या क्रूझ् क्षेपणास्त्राची चाचणी

मॉस्को – रशियाच्या नौदलाने ‘सी ऑफ जपान’मधून लांब पल्ल्याच्या कॅलिबर क्रूझ् क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राने किमान एक हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदले. रशियाने पहिल्यांदाच विनाशिकेवरुन दिर्घ पल्ल्याच्या क्रूझ् क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचा दावा केला जातो. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या वरिष्ठ नौदल अधिकार्‍यांनी रशियाच्या कॅलिबर क्रूझ् क्षेपणास्त्रावर चिंता व्यक्त केली होती.

Advertisement

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘मार्शल शॅपोश्‍निकोव्ह’ या विनाशिकेतून कॅलिबर क्रूझ् क्षेपणास्त्राचा मारा करण्यात आला. या क्षेपणास्त्राने ‘केप सुरकम’च्या किनारपट्टीवरील लक्ष्य अचूकरित्या व अचूक वेळेत भेदले. यासाठी कॅलिबर क्षेपणास्त्राने हजार किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास केला. या चाचणीसाठी ‘पीटर द ग्रेटचे आखात’ या सागरी क्षेत्रातील जहाजांची तसेच विमानांची वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली होती. तसेच ‘कॅमोव्ह केए-२७’ हेलिकॉप्टर देखील तैनात करण्यात आले होते.

‘मार्शल शॅपोश्‍निकोव्ह’ ही रशियन नौदलातील आधुनिक विनाशिका म्हणून ओळखली जाते. पाणबुडीविरोधी युद्धासाठी या विनाशिकेचा वापर केला जातो. या विनाशिकेवर आठ ‘स्टॅलियन’ पाणबुडीभेदी क्षेपणास्त्रे व दोन ‘आरबीयू १२०००’ पाणबुडीभेदी रॉकेट लॉंचर्स तैनात आहेत. तसेच सदर विनाशिका ‘उरन’ या विनाशिकाभेदी क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे. याशिवाय शॅपोश्‍निकोव्ह विनाशिकेत जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांचा मोठा साठा आहे. अशा परिस्थितीत, कॅलिबर क्रूझ् क्षेपणास्त्रांनी सदर विनाशिका सज्ज झाल्यामुळे रशियाच्या पॅसिफिक फ्लिटच्या सामर्थ्यात वाढ झाल्याचा दावा स्थानिक माध्यमे करीत आहेत.

रशियाच्या कॅलिबर क्रूझ् क्षेपणास्त्राच्या सामर्थ्यावर अमेरिकेच्या ‘इंडो-पॅसिफिक कमांड’चे प्रमुख ऍडमिरल फिल डेव्हिडसन यांनी गेल्या महिन्यात चिंता व्यक्त केली होती. सदर क्षेपणास्त्र अमेरिकेच्या या क्षेत्रातील प्रभावासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा ऍडमिरल डेव्हिडसन यांनी अमेरिकन कॉंग्रेसला सादर केलेल्या अहवालात दिला होता. या क्षेपणास्त्रामुळे रशियन नौदलाच्या विनाशिकाभेदी सामर्थ्यात मोठी वाढ होईल, असे ऍडमिरल डेव्हिडसन यांनी बजावले होते. या दिर्घ पल्ल्याच्या क्रूझ् क्षेपणास्त्राबरोबरच अत्याधुनिक लढाऊ विमाने, लांब पल्ल्याची बॉम्बर्स विमाने आणि हवाई सुरक्षा यंत्रणेच्या तैनातीसह रशिया आपल्या पॅसिफिक फ्लिटचे आधुनिकीकरण करीत असल्याचे ऍडमिरल डेव्हिडसन यांनी लक्षात आणून दिले होते.

leave a reply