चीन-पाकिस्तानच्या सहकार्यापासून देशाला धोका

- लष्करप्रमुख जनरल नरवणे

नवी दिल्ली – ‘चीन आणि पाकिस्तानच्या सहकार्यापासून भारताला गंभीर धोका संभवतो. दोन्ही देश एकमेकांना लष्करी व बिगर लष्करी आघाड्यांवर सहकार्य करीत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एकाच वेळी चीन व पाकिस्तान अशा दोन आघाड्यांवर लष्कराने युद्धाची तयारी ठेवलेली आहे. भारतीय सेना कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे’, अशा खणखणीत शब्दात लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी या दोन्ही देशांना इशारा दिला. त्याचवेळी लडाखच्या पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील टेकड्यांवरील आपली तैनाती भारतीय लष्कर मागे घेणार नाही, असेही लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले.चीन-पाकिस्तान

‘चीन आणि पाकिस्तानचे सहकार्य ही केवळ शक्यतेच्या पातळीवर राहिलेली बाब नाही दोन्ही देश परस्परांना लष्करी आणि बिगर लष्करी पातळ्यांवर सहकार्य करीत आहे व ते स्पष्टपणे दिसू लागले आहे. दोन्ही देशांच्या या सहकार्याचा भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका संभवतो, ही बाब कधीही दुर्लक्षित करता येणार नाही. त्यावर लष्कराची नजर रोखलेली असून एकाच वेळी दोन आघाड्यांवर युद्धाची सज्जता लष्कराने ठेवलेली आहे’, असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. लडाखमध्येच नाही तर चीनबरोबरील संपूर्ण एलएसीबाबत भारतीय लष्कर अतिशय सावध आहे, असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले.

लडाखच्या एलएसीवरील वाद सोडविण्यासाठी चीनबरोबर चर्चा सुरू आहे व हा वाद चर्चेच्या माध्यमातून सुटेल, असा विश्‍वास जनरल नरवणे यांनी व्यक्त केला. मात्र लडाखच्या एलएसीवरील पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील टेकड्यांवरील तैनाती लष्कर मागे घेणार नाही, ही तैनाती देशहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे, असे लष्करप्रमुख पुढे म्हणाले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भारतीय लष्कराने या टेकड्यांचा ताबा घेऊन चिनी लष्कराचे डावपेच उधळून लावले होते. भारतीय लष्कराने इथून माघार घ्यावी, अशी मागणी चीनकडून सातत्याने केली जाते. त्या पार्श्‍वभूमीवर लष्करप्रमुखांनी केलेला हा खुलासा महत्त्वाचा ठरतो.

दरम्यान, पाकिस्तान अजूनही दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे आणि भारताने दहशतवाद खपवून न घेण्याचे धोरण स्वीकारलेले आहे. त्यामुळे पुढच्या काळात पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना जबरदस्त प्रत्युत्तर दिले जाईल. हे प्रत्युत्तर घणाघाती आणि नेमके असेल, अशा सूचक शब्दात लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला इशारा दिला. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी पुन्हा सक्रीय झाले असून ते जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर, लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला दिलेला हा इशारा लक्षवेधी ठरतो.

चीन व पाकिस्तान मिळून एकाच वेळी भारताला पूर्व आणि पश्‍चिम सीमेवर आव्हान देऊ शकतात. हा धोका लक्षात घेऊन भारताने फार आधीपासून एकाच वेळी दोन आघाड्यांवरील संघर्षाची तयारी ठेवलेली आहे, असे भारताचे सामरिक विश्‍लेषक व माजी लष्करी अधिकारी सातत्याने सांगत आले आहेत. दोन्ही सीमांचे रक्षण करण्यासाठी लष्कराची तैनाती, रसदीचा पुरवठा यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे आणि त्यावर ताण येणार नाही, हे लक्षात घेऊन भारताने आपली यंत्रणा उभारलेली आहे, असे या सामरिक विश्‍लेषक व माजी लष्करी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

leave a reply