कोरोनाचे मूळ दडविण्यासाठी चीनचे योजनाबद्ध प्रयत्न

- आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेचा ठपका

बीजिंग – गेल्या वर्षात जगभरात हाहाकार उडविणार्‍या कोरोनाव्हायरसचे मूळ उघड होऊ नये म्हणून चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट योजनाबद्ध प्रयत्न करीत असल्याचा ठपका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने ठेवला आहे. अमेरिकेत मुख्यालय असलेल्या ‘असोसिएटेड प्रेस’(एपी) या वृत्तसंस्थेकडून कोरोनाव्हायरसचे मूळ शोधण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत चीनच्या यंत्रणांनी अडथळे आणल्याचे उघड झाले. काही दिवसांपूर्वीच चीनच्या न्यायालयाने कोरोनाव्हायरसची माहिती देणार्‍या एका महिला पत्रकाराला चार वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता ‘एपी’चा रिपोर्ट समोर आल्याने कोरोनाच्या मुद्यावर चीनच्या सत्ताधार्‍यांवर होणार्‍या आरोपांना दुजोरा मिळाल्याचे दिसत आहे.

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या आठ कोटी ३५ लाखांवर गेली असून दगावणार्‍यांची संख्या १८ लाखांवर पोहोचली आहे. चीनसह काही अपवाद वगळता जगातील प्रमुख देशांमध्ये कोरोनाच्या साथीची नवी लाट आल्याचे व वेगाने प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ (डब्ल्यूएचओ) आपले वैद्यकीय पथक चीनमध्ये चौकशीसाठी धाडणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. हे पथक चिनी यंत्रणांकडून कोरोनाव्हायरसच्या साथीची अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करील.

या पार्श्‍वभूमीवर ‘एपी’चा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्याने चीनच्या भूमिकेबाबत पुन्हा एकदा संशयाचे धुके उभे राहू लागले आहे. कोरोनाची साथ चीनच्या वुहानमधील प्राण्यांच्या बाजारपेठेतून सुरू झाल्याचे सांगण्यात येते. या बाजारपेठेत आलेल्या वटवाघुळांमधून कोरोनाचा संसर्ग पसरल्याची माहिती समोर आली होती. ज्या प्रजातीतून हा संसर्ग पसरला ती वटवाघळे चीनच्या युनान प्रांतातील गुहांमध्ये आढळतात. ही बाब लक्षात घेऊन चीन तसेच परदेशातील काही संशोधकांनी या गुहांमध्ये आढळणार्‍या वटवाघळांचा अभ्यास सुरू केला.

‘मात्र चीनच्या यंत्रणांनी काही संशोधकांना इथल्या गुहांपर्यंत पोहोचू दिले नाही. ज्या संशोधकांनी अभ्यास केला त्यांच्याकडील नमुने व इतर सामुग्री जप्त करण्यात आली. चीनच्या संशोधकांकडून करण्यात आलेले संशोधन सरकारी यंत्रणांकडून पद्धतशीरपणे दडपण्यात आले. अधिकृत पातळीवर, चीनच्या यंत्रणांनी कायम संशोधन व अभ्यास सुरू आहे, हाच खुलासा कायम ठेवला असून इतरांना माहिती देण्याचे नाकारले’, असा दावा वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात केला. ‘एपी’च्या पत्रकारांचे पथक युनानमध्ये गेले असता चिनी पोलिसांनी गाडीचा पाठलाग केल्याचे तसेच गुहेत जाण्यापासून रोखल्याचेही आरोप त्यांच्या अहवालात करण्यात आले आहेत.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आदेशानुसार मार्च महिन्यात एक स्पेशल टास्क फोर्स स्थापन करण्यात आला होता. ही टास्क फोर्स सरकारी यंत्रणा व प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने कोरोनाव्हायरससंदर्भातील माहिती दडपण्याचे काम करीत असल्याचे ‘असोसिएटेड प्रेस’च्या(एपी) रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. चीनच्या विविध संशोधनसंस्थांनी अनुदान देऊन तयार केलेले अहवाल दडपण्यात आले असून, ‘शी झेंगली’सारख्या आघाडीच्या संशोधिकेने दिलेली माहितीही नाकारण्यात आली आहे.

कोरोनाव्हायरसचे मूळ चीनमध्ये नसून बाहेरील देशांमध्ये असल्याचे प्रयत्नही करण्यात आले आहेत. हे प्रयत्न चीनकडून जबाबदारी झटकण्याच्या मोहिमेचा भाग असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. कोरोनाव्हायरसचे मूळ शोधण्याबरोबरच या साथीच्या पहिल्या रुग्णाबाबतची खरी माहितीही चीनने लपविली असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

यापूर्वी अमेरिका, युरोपिय देश, ऑस्ट्रेलिया यांनी कोरोनाचे मूळ चीनमध्येच असल्याचे आरोप करून चीनच्या सत्ताधार्‍यांनी त्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली होती. हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत होता. मात्र ‘असोसिएटेड प्रेस’सारख्या ख्यातनाम वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेला रिपोर्ट चीनची कोंडी करणारा ठरत आहे.

काही दिवसांपूर्वी जपानचे उपसंरक्षणमंत्री नाकायामा यांनीही चीन व जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबतची सारी माहिती उघड करावी, सारे जग याची प्रतिक्षा करीत असल्याचे सुनावले होते.

leave a reply