घुसखोरीद्वारे तैवानची यथास्थिती बदलण्याचे चीनचे कारस्थान

- तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

यथास्थितीतैपेई – तैवानच्या क्षेत्राजवळील युद्धसराव आणि तैवानच्या हवाई हद्दीत आपल्या लढाऊ विमानांची घुसखोरी, याद्वारे चीन इथली यथास्थिती बदलण्याच्या तयारीत आहे. हा तैवानच्या सीमा धुसर करून चीनला हव्या तशा सीमा आखण्याच्या प्रयत्नाचा भाग ठरतो, असा गंभीर आरोप तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी केला. तैवानच्या जनतेला चीनच्या या धोक्याची जाणीव करून दिली जात आहे. याद्वारे जनतेला देखील युद्धसज्ज करण्याची तयारी तैवानचे सरकार करीत असल्याची माहिती तैवानमधील लष्करी विश्लेषक देत आहेत.

दोन देशांमधील विवादास्पद सागरी सीमा निश्चित होत नाही, तोपर्यंत हे दोन्ही देश आभासी मध्यरेषेवर सहमतीद्वारे सागरी तसेच हवाई वाहतूक सुरू ठेवतात. चीन आणि तैवानमध्ये देखील १९५४ सालापासून अशारितीने इथला व्यापार व वाहतूक सुरू होती. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने अधिकृत पातळीवर याला मान्यता दिलेली नसली, तरी याच्या विरोधात टोकाची आक्रमक भूमिकाही स्वीकारली नव्हती. पण गेल्या काही दिवसांपासून चीनने या आभासी मध्यरेषेचे उल्लंघन करून तैवानविरोधात आणखी एक पाऊल उचलल्याचे दिसते आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने चीनच्या या गंभीर कारवाया निदर्शनास आणून दिल्या.

यथास्थितीयानुसार, ५ ते २५ ऑगस्टच्या दरम्यान चीनने ६२० लढाऊ विमाने तैवानच्या दिशेने रवाना केली होती. यापैकी जवळपास ३०० लढाऊ व बॉम्बर विमानांनी तैवानच्या ‘मिडियन लाईन’चे उल्लंघन केले. चीनच्या या घुसखोरीवर टीका करताना तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी चीनने तैवानच्या भोवती सुरू केलेला युद्धसराव आणि लढाऊ विमानांच्या घुसखोरीवर ताशेरे ओढले आहेत. चीनने सुरू केलेले युद्धसराव एकट्या तैवानसाठी नाही तर या क्षेत्रातून मालवाहतूक करणारी जहाजे आणि विमानांसाठी देखील धोकादायक ठरत असल्याचे परराष्ट्रमंत्री वू यांनी निदर्शनास आणून दिले. मध्यरेषा ओलांडून चीन इथली यथास्थिती बदलण्याचा आणि नवी सीमा आखण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप तैवानचे परराष्ट्रमंत्री वू यांनी केला.

यथास्थिती‘मात्र चीनने कितीही दावा केला तरी तैवानमध्ये स्वतंत्र, लोकशाहीवादी आणि जनतेने निवडून दिलेले सरकार आहे. तैवानचे लष्कर आणि राजकीय व्यवस्था आपले निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र आहेत’, असा टोला तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लगावला. तसेच चीनची कम्युनिस्ट राजवट तैवानवर आपला हक्क सांगत असली तरी तिचा वास्तविकतेशी अजिबात संबंध नसल्याचे परराष्ट्रमंत्री वू यांनी ठणकावले. तैवानचे इतर नेते देखील आंतरराष्ट्रीय माध्यमांशी बोलताना चीन तैवानच्या आखातातील मध्यरेषा धुसर करण्याचा प्रत्यन करीत असल्याचा आरोप करीत आहेत.

दरम्यान, चीनच्या या वाढत्या धोक्याबाबत तैवानच्या जनतेला सावध केले जात आहे. याद्वारे तैवानचे सरकार आपल्या जनतेला चीनविरोधी संघर्षासाठी तयार करीत असल्याचा दावा तैवानी विश्लेषकांनी केला आहे.

leave a reply