अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानात शिरकाव करण्याची चीनची तयारी

बीजिंग/इस्लामाबाद – अमेरिकेच्या सैन्यमाघारीचा लाभ घेऊन चीन अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीला लागला आहे. 12 ते 16 जुलै दरम्यान, चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानचा दौरा करणार आहेत. अफगाणिस्तानचा मुद्दा या दौर्‍याच्या केंद्रस्थानी असेल. चीन अफगाणिस्तानात स्थैर्य प्रस्थापित करून क्षेत्रिय शांतता निश्‍चित करील, असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. मात्र अफगाणिस्तानातील तीन ट्रिलियन डॉलर्सची खनिजसंपत्ती चीनला खुणावत असल्याचे आरोप सुरू झाले आहेत. तसेच अफगाणिस्तानचा वापर करून मध्य अशियाई देशांबरोबरील व्यापार वाढविण्यासाठी चीनच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी पाकिस्तानचा वापर करण्याची चीनची योजना आहे आणि पाकिस्ताननेही चीनच्या हुकूमाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानात शिरकाव करण्याची चीनची तयारीअमेरिकेच्या सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अफगाणिस्तानात तालिबानची राजवट येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानात माघार घेतल्याने निर्माण झालेली पोकळी चीन भरून काढणार का, याची चर्चा विश्‍लेषक करू लागले आहेत. चिनी वंशाचे विख्यात विश्‍लेषक गॉर्डन चँग यांनी तर महासत्तांची दफनभूमी म्हणून प्रसिद्ध असेलल्या अफगाणिस्तानच्या दलदलीत चीन रूतणार असल्याचा दावा केला आहे. मात्र अफगाणिस्तानातील परिस्थितीचा अंदाज घेऊन चीन या देशात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची तयारी करीत आहे. यासाठीच चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानचा दौरा करणार आहेत. या दौर्‍यात अफगाणिस्तानातील शांततेला चीन सर्वाधिक प्राधान्य देईल व याद्वारे क्षेत्रिय शांतता सुनिश्‍चित करील, असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केला. त्यांचे हे दावे प्रसिद्ध होत असतानाच, पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री शेख रशिद यांनीही पत्रकार परिषदेत अफगाणिस्तानबाबत चीनची फार मोठी योजना असल्याचे जाहीर करून टाकले.

अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानात शिरकाव करण्याची चीनची तयारीचीनने इराणमध्ये 400 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. अफगाणिस्तान स्थीर व शांत झाल्याखेरीज इराणमध्ये चीन ही गुंतवणूक करूच शकत नाही, असे सांगून अफगाणिस्तानात चीनचे हितसंबंध गुंतलेले असल्याचे शेख रशिद यांनी जाहीर केले. त्याचवेळी पाकिस्तान देखील अफगाणिस्तानात चीनला सहाय्य करणार असल्याचा दावा शेख रशिद यांनी केला. त्यामुळे पाकिस्तानमार्फत तालिबानचा वापर करून चीन अफगाणिस्तानात वर्चस्व प्रस्थापित करणार असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. तालिबानने देखील अफगाणिस्तानात चीनच्या गुंतवणुकीचे स्वागत होईल, असे जाहीर केले होते.

अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून इंधन व खनिजसंपन्न मध्य आशियाई देशांबरोबर व्यापार करण्याची चीनची महत्त्वाकांक्षा आहे. उझबेकिस्तानपर्यंत रेल्वे नेऊन अफगाणिस्तान, पाकिस्तानमार्गे ती चीनला जोडण्याची योजना लवकरच कार्यान्वित होऊ शकते, असा दावा पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षामंत्र्यांनी केला. त्यातून चीनही ही महत्त्वाकांक्षा अधिक प्रकर्षाने समोर आली. त्याचवेळी अफगाणिस्तानातील सुमारे तीन ट्रिलियन डॉलर्स इतकी प्रचंड खनिजसंपत्ती असून त्यावर चीनचा डोळा आहे, हे लपून राहिलेले नाही. मात्र यासाठी चीन अफगाणिस्तानात लष्कर पाठविण्याची चूक करणार नाही. त्यासाठी पाकिस्तानला कंत्राट देऊन चीन आपल्याला अपेक्षित असलेल्या गोष्टी घडवून आणेल, असा दावा काही विश्‍लेषक करीत आहेत. त्याचवेळी अमेरिका हे सहजासहजी होऊ देणार नाही, त्यामागे अमेरिकेचा फार मोठा डाव असल्याचा संशय काहीजण व्यक्त करीत आहेत.

leave a reply