कंदहारमधील भारताचे राजनैतिक अधिकारी मायदेशी परतले

नवी दिल्ली – अफगाणिस्तानच्या 200 हून अधिक जिल्ह्यांचा ताबा घेणार्‍या तालिबानच्या दहशतवाद्यांनी काही तासांपूर्वी दक्षिणेकडील कंदहार शहरात घुसखोरी केली. यामुळे सावध झालेल्या भारताने कंदहारमधील आपल्या उच्चायुक्तालयातील 50 राजनैतिक अधिकार्‍यांना सुरक्षितरित्या मायदेशी आणले. असे असले तरी कंदहारमधील उच्चायुक्तालय सुरू असून इथे कामकाज सुरू असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. त्याचबरोबर शांतीपूर्ण, सार्वभौम आणि लोकशाही अफगाणिस्तानसाठी भारत बांधिल असेल, असेही परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले.

कंदहारमधील भारताचे राजनैतिक अधिकारी मायदेशी परतलेगेल्या दोन महिन्यांपासून तालिबानी दहशतवाद्यांच्या अफगाणिस्तानात कारवाया तीव्र झाल्या आहेत. अफगाणिस्तानच्या 85 टक्के भूभागावर ताबा मिळविल्याचा दावा तालिबान करीत आहे. तालिबानच्या या हल्ल्यांमुळे घाबरलेल्या चीन, इराण, तुर्की या देशांनी दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील आपली उच्चायुक्तालये बंद करून आपल्या अधिकार्‍यांना बाहेर काढले होते. यानंतर भारताने देखील राजधानी काबुलमधील आपले दूतावास बंद केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट शब्दात या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे सांगून काबुलमधील दूतावासातील कामकाज सुरू असल्याचे जाहीर केले होते.

कंदहारमधील भारताचे राजनैतिक अधिकारी मायदेशी परतलेत्यानंतर शनिवारी संध्याकाळी पुन्हा एकदा भारताने कंदहारमधील उच्चायुक्तालय बंद करून आपल्या कर्मचार्‍यांना मायदेशी आणल्याच्या बातम्या आल्या होत्या. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा यावर प्रतिक्रिया देताना, उच्चायुक्तालय बंद केले नसल्याचे जाहीर केले. स्थानिक अधिकार्‍यांच्या सहाय्याने उच्चायुक्तालयातील कामकाज तसेच व्हिसा सेवा सुरू असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले. विशेष विमान रवाना करून उच्चायुक्तालयातील भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांना मायदेशी आणले असून ही तात्पुरती कारवाई आहे. अफगाणिस्तानातील सुरक्षाविषयक घडामोडींवर भारताची बारीक नजर असल्याचे बागची यांनी स्पष्ट केले.

अफगाणिस्तानात लष्कर आणि तालिबानमधील संघर्ष अधिकाधिक तीव्र होत आहे. या संघर्षात पाकिस्तानी लष्कराचे जवान तालिबानच्या पेहरावात सामील झाल्याच्या बातम्या स्थानिक माध्यमांमधून समोर येत आहेत. त्याचबरोबर लश्कर-ए-तोयबा सारख्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना देखील अफगाणिस्तानात तळ ठोकून असल्याचे याआधी स्पष्ट झाले आहे. अफगाणिस्तानातील संघर्षाचा फायदा घेऊन या पाकिस्तानी दहशतवादी संघटना व पाकिस्तानचे लष्कर येथील भारतीय हितसंबंधांवर हल्ले चढवू शकतात, अशी चिंता व्यक्त केली जाते.

leave a reply