इस्रायलने गाझा, लेबेनॉन सीमेवर शस्त्रांची तस्करी पकडली

- मोठा कट उधळल्याचा इस्रायली माध्यमांचा दावा

जेरूसलेम – गेल्या दोन दिवसात इस्रायलने गाझापट्टी आणि लेबेनॉनच्या सीमेवर मोठी शस्त्रांच्या तस्करीचा प्रयत्न उधळला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात पिस्तुले, सुरे आणि इतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यामागे गाझातील हमास व लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटना असण्याची शक्यता वर्तविली जाते. इस्रायलच्या सीमेवर रॉकेट हल्ले घडविणार्‍या दहशतवादी संघटनांनी इस्रायलमध्ये घुसून हिंसाचार घडविण्याची योजना आखल्याचा दावा इस्रायली अधिकारी करीत आहेत.

इस्रायलने गाझा, लेबेनॉन सीमेवर शस्त्रांची तस्करी पकडली - मोठा कट उधळल्याचा इस्रायली माध्यमांचा दावाइस्रायलच्या लष्कराने शुक्रवारी आणि शनिवारी रात्री दोन वेगवेगळ्या केलेल्या कारवाईत, लाखो डॉलर्सचा शस्त्रसाठा जप्त केला. इस्रायली माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री लेबेनॉनच्या दक्षिण सीमेतून इस्रायलमध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा मोठा डाव उधळला. इस्रायली माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये दोन संशयित या तस्करीमध्ये गुंतलेले असल्याचे उघड होत आहे. इस्रायली लष्कराने वेळीच कारवाई करून सुमारे 43 पिस्तुले आणि इतर शस्त्रसाठा जप्त केला. यामागे लेबेनॉनमधील इराणसंलग्न हिजबुल्लाह असण्याची दाट शक्यता असल्याचा दावा इस्रायली यंत्रणांनी केला.

याला चोवीस तासही उलटत नाही तोच, शनिवारी रात्री गाझापट्टीच्या सीमेतून तीन पॅलेस्टिनींनी इस्रायलच्या हद्दीत घुसखोरी केली. इस्रायलने गाझा, लेबेनॉन सीमेवर शस्त्रांची तस्करी पकडली - मोठा कट उधळल्याचा इस्रायली माध्यमांचा दावाइस्रायली सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या तपासात या तिघांकडून धारदार सुरे व इतर शस्त्रसाठा जप्त केला. अवघ्या काही तासांच्या फरकाने या दोन्ही घटना घडल्यामुळे हमास व हिजबुल्लाह मिळून इस्रायलविरोधात मोठा कट रचत असल्याचा संशय इस्रायली अधिकार्‍यांनी व्यक्त केला.

इस्रायलच्या शहरांमध्ये हिंसाचार किंवा दंगली घडविण्यासाठी या दहशतवादी संघटना शस्त्रास्त्रांची तस्करी करीत असल्याचा दावा इस्रायली अधिकार्‍यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना केला. गेल्या महिन्यात हमास व हिजबुल्लाहच्या नेत्यांनी तशी धमकी दिली होती. तर त्यानंतर बैरूतमध्ये हमास व हिजबुल्लाहच्या नेत्यांची बैठकही झाली होती.

leave a reply