चीन चंद्रावर मालकी हक्क सांगण्याच्या तयारीत आहे

- नासाच्या प्रमुखांचा इशारा

चंद्रावरवॉशिंग्टन – ‘अंतराळात जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. चीन अंतराळ संशोधनाच्या नावाखाली चंद्रावर जागा हडपण्याचा प्रयत्न करु शकतो. त्यामुळे अमेरिकेला त्यावर बारीक लक्ष ठेवणे भाग आहे. हे आमचे क्षेत्र आहे व तुम्ही इथून बाहेर जा, असे चीन कधीही सांगू शकतो आणि हे वास्तव नाकारता येणार नाही’, असा इशारा अमेरिकी अंतराळसंस्था नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी दिला. गेल्याच महिन्यात चीनने अंतराळात नवे ‘अवकाश स्थानक’ कार्यरत करीत असल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर नेल्सन यांचा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

अमेरिकेच्या ‘ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’ने 2021 साली चीनच्या अंतराळातील कारवायांबाबत विस्तृत अहवाल प्रसिद्ध केला होता. ‘अंतराळाचे लष्करीकरण करणे, ही चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची योजना आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देणे आणि अमेरिकेवर आघाडी मिळविणे, हा चीनच्या योजनेचा एक भाग आहे. 2022 ते 2024 यादरम्यान, चीन पृथ्वीच्या कक्षेत स्पेस स्टेशन उभारणार आहे. या स्पेस स्टेशनचा वापर देखील अंतराळाच्या लष्करीकरणासाठी आणि अमेरिकेचा प्रभाव कमी करण्यासाठी होऊ शकतो’, असे अमेरिकेच्या अहवालात बजावण्यात आले होते.

चंद्रावर‘पॉलिटिको’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नेल्सन यांनी चीनच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधले. ‘चीन चंद्रावर दाखल झाल्यानंतर लगेच त्यातील विविध भागांवर आपला हक्क सांगू शकतो. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने पृथ्वीवर जे धोरण वापरले त्याचीच पुनरावृत्ती अंतराळात होऊ शकते. साऊथ चायना सीमधील स्प्राटले बेटांवर चीनने आपला हक्क सांगून ती ताब्यात घेतली होती’, अशा शब्दात नासाच्या प्रमुखांनी चीनच्या कारवायांची जाणीव करून दिली.

चीनने गेल्या काही वर्षात अंतराळक्षेत्रात आक्रमक मोहिमा राबविल्या असून 2035 सालापर्यंत चंद्रावर तळ उभारण्याची योजना आखली आहे. अमेरिकेच्या विविध अधिकाऱ्यांकडून याबाबत इशारेही देण्यात येत आहेत. . ‘चीन अत्यंत वेगाने अंतराळात विविध क्षमता असणाऱ्या यंत्रणा तैनात करीत आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत चीन अंतराळक्षेत्रातील आघाडीची सत्ता बनलेला असेल’, असे अमेरिकेच्या ‘स्पेस फोर्स’चे वरिष्ठ अधिकारी जनरल डेव्हिड थॉम्पसन यांनी काही महिन्यांपूर्वीच बजावले होते. गेल्याच आठवड्यात चीनने रशियाबरोबरील अंतराळक्षेत्रातील सहकार्य अधिक वाढवित असल्याचे जाहीर केले होते.

leave a reply