सिरियन विमानतळावरील इस्रायलच्या हल्ल्यात चार ठार

इराणच्या शस्त्रसाठ्याला लक्ष्य केल्याची शक्यता

बैरूत – सिरियाची राजधानी दमास्कसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात चार जवान ठार झाले. इस्रायलच्या लष्कराने हा हल्ला चढविल्याचा आरोप सिरियन लष्कर करीत आहे. या हल्ल्यामुळे दमास्कस विमानतळ काही काळासाठी बंद करावे लागले होते. इस्रायलने सदर विमानतळावरील इराणच्या छुप्या शस्त्रसाठ्याला लक्ष्य केल्याची दाट शक्यता वर्तविली जाते. सात महिन्यांपूर्वी इस्रायलने या विमानतळावर असेच हवाई हल्ले चढविले होते.

syria-israel-damascus-strikeलेबेनॉनमधील हिजबुल्ला तसेच सिरियातील दहशतवादी संघटनांना शस्त्रसज्ज करण्यासाठी इराण दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वापर करीत असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. इराण शस्त्रतस्करीसाठी आपल्या प्रवासी विमानांचा वापर करून हा शस्त्रसाठा दमास्कस विमानतळावर साठवित असल्याचा ठपका याआधी ठेवण्यात आला होता. या शस्त्रास्त्रांच्या सहाय्याने इराणने इस्रायलविरोधी युद्धाचा कट आखल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. पण सिरिया तसेच इराणने इस्रायलचे हे आरोप फेटाळले होते.

गेल्या वर्षी 10 जून रोजी इस्रायलच्या लढाऊ विमानांनी दमास्कस विमानतळावर जोरदार हल्ले चढविले होते. यामध्ये इराणच्या शस्त्रास्त्रांसाठी वापरले जाणारे कोठार नष्ट झाल्याचा दावा सिरियातील ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटना व इस्रायली माध्यमांनी केला होता. सिरिया व इराणने या आरोपांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. पण इस्रायलच्या हल्ल्यात येथील धावपट्टीचे देखील जबर नुकसान झाल्याचा दावा सिरियन सरकारने म्हटले होते. यानंतर दोन आठवड्यांसाठी सदर विमानतळ बंद करावे लागले होते.

रविवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजता पुन्हा याच विमानतळावर क्षेपणास्त्रांचे हल्ले झाले. इस्रायलच्या लेक तिबेरियास या तळावरुन हे क्षेपणास्त्र हल्ले झाल्याचा दावा सिरियन लष्कराने केला. या हल्ल्यात आपल्या दोन जवानांचा बळी गेला तर दोन जखमी झाल्याचे सिरियन लष्कराने म्हटले आहे.

पण दमास्कस विमानतळावरील हल्ल्यात एकूण चार जणांचा बळी गेला असून यात दोन सिरियन जवानांचा समावेश आहे. तर अन्य दोघे इराणसंलग्न गटाचे दहशतवादी होते, असे ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने सिरियातील आपल्या वेगवेगळ्या सूत्रांच्या हवाल्याने स्पष्ट केले. दमास्कसच्या विमानतळावरील इराणसंलग्न गटाच्या दहशतवाद्यांची तैनाती लक्षात घेता येथे इराणचा शस्त्रसाठा असल्याच्या इस्रायलच्या आरोपांना बळ मिळत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत.

इस्रायली लष्कराची 2023 सालातील भूमिका याबाबत इस्रायलच्या लष्करी मोहिमांचे प्रमुख मेजर जनरल ओदेद बास्यूक सिरियामध्ये हिजबुल्लाह 2.0 होऊ देणार नाही, असे ठणकावले होते. याद्वारे हिजबुल्लाह किंवा इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना सिरियात मजबूत होऊ देणार नसल्याचे मेजर जनरल बास्यूक यांनी बजावले होते. तर संरक्षणदलप्रमुख मेजर जनरल अविव कोशावी यांनी देखील आखातात आपले लष्कर प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या इराणला यशस्वी होऊ देणार नसल्याचे जाहीर केले होते.

leave a reply