तैवानवरील भारतीय माध्यमांच्या भूमिकेमुळे चीन अस्वस्थ

नवी दिल्ली/तैपेई – भारत सरकारने ‘वन चायना पॉलिसी’ला मान्यता दिलेली आहे. भारतीय माध्यमांनीही आपल्या देशाच्या या अधिकृत धोरणाचा सन्मान करुन तैवानचा स्वतंत्र देश असा उल्लेख करण्याचे टाळावे, अशी मागणी करणारे निवेदन भारतातील चीनच्या दूतावासाने प्रसिद्ध केले आहे. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या देशात माध्यमांना मते मांडण्यास पूर्ण स्वातंत्र असल्याचे म्हटले आहे. तर अशारितीने भारतीय माध्यमांना तैवानच्या प्रश्नावर छेडून चीनने घोडचूक केली आहे, असा निष्कर्ष भारतीय पत्रकार व विश्लेषक नोंदवित आहेत. पुढच्या काळात भारतीय माध्यमांमधून ‘स्वतंत्र तैवान’चा मुद्दा अधिक आक्रमकतेने लावून धरला जाईल आणि चीनला त्यावेळी आपण केलेल्या या चुकीची जाणीव होईल, असे पत्रकारांचे म्हणणे आहे. त्याचवेळी चीनच्या या दंडेलीवर खवळलेल्या तैवानने चीनला ‘गेट लॉस्ट’ अशा शब्दात फटकारले आहे.

भारतीय माध्यम

येत्या शनिवारी १० ऑक्टोबर रोजी तैवानचा राष्ट्रीय दिन आहे. यानिमित्ताने भारतात तैवानचा उल्लेख स्वतंत्र देश म्हणून केला जाऊ शकतो, अशी भीती चीनला असुरक्षित बनवित आहे. असे झाले तर स्वतंत्र तैवान, तिबेट, हाँगकाँगसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा जोर वाढेल, या चिंतेने चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला ग्रासले आहे. या पार्श्वभूमीवर, भारतातील चीनच्या राजदूतांनी भारतीय प्रसारमाध्यमांसाठी जणू ‘मार्गदर्शक तत्त्वे’ जाहीर करुन अप्रत्यक्षरित्या भारताला इशारा दिला.

‘‘चीन हा जगामध्ये एकमेव देश असून त्याखेरीज दुसरा चीन अस्तित्वात नाही. त्यामुळे भारतीय माध्यमांनी भारत सरकारच्या भूमिकेशी एकरुप राहून तैवानचा स्वतंत्र देश असा उल्लेख करुन ‘वन चायना’ धोरणाचे उल्लंघन करू नये. त्याचबरोबर त्साई ईंग-वेन यांचाही उल्लेख राष्ट्राध्यक्षा असा करु नये. यामुळे जनसामान्यांमध्ये चुकीचा संदेश जातो”, अशी मागणी चीनच्या दूतावासाने केली आहे. अशी मागणी करुन चीन महासत्तेसारखा नाही तर रस्त्यातील गुंडासारखा वर्तन करीत असल्याची टीका भारतातील आघाडीच्या पत्रकार व विश्लेषकांनी केली. तसेच या पत्रातून चीन भारतीय माध्यमांना नाही तर भारताला छुप्यारितीने इशारा देत असल्याचा आरोपही काही विश्लेषकांनी केला होता.

भारतीय माध्यम

चीनच्या दूतावासाने माध्यमांसमोर केलेल्या या मागणीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. भारतात माध्यमांना स्वातंत्र्य असून ते योग्य असेल त्या मुद्यांवर बिनधास्त लिहितात, अशा एका वाक्यात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी यावर प्रतिक्रिया दिली. यानंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान, लिबिया या मुद्यांवर भारताची भूमिका मांडून चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’वर बोलण्याचे टाळले.

भारतीय माध्यमांवर ‘सेन्सॉरशीप’ लादण्याच्या चीनच्या या प्रयत्‍नांना तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दणदणीत प्रत्युत्तर दिले. ‘‘भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. येथील प्रसारमाध्यमांना त्यांचे स्वातंत्र्य प्रिय आहे. पण कम्युनिस्ट विचारसरणीचा चीन भारतीय उपखंडात सेन्सॉरशीप लादण्याचा प्रयत्‍न करत असल्याचे दिसत आहे. तैवानच्या भारतीय मित्रांकडून चीनला ‘उडत जा’, असे एकच उत्तर मिळू शकते’’, असा शेरा तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी मारला आहे.

leave a reply