वर्चस्ववादी राजवटी पॅसिफिक क्षेत्रातील बेटदेशांवर दडपशाहीचा वापर करतील

- अमेरिकेच्या परराष्ट्र उपमंत्री वेंडी शेर्मन यांचा इशारा

वर्चस्ववादी राजवटीहोनिआरा/टोंगा – रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला व चीनकडून तैवानविरोधात सुरू असलेल्या युद्धसरावाचा उल्लेख करीत, जगातील काही वर्चस्ववादी राजवटी पॅसिफिक क्षेत्रातील बेटदेशांवर दडपशाही व बळजबरीचा वापर करु शकतात, असा गंभीर इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र उपमंत्री वेंडी शेर्मन यांनी दिला. शेर्मन सध्या पॅसिफिक क्षेत्राच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी टोंगा व सॉलोमन आयलंडस्‌‍ या बेटदेशांना भेट दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन पुढील महिन्यात पॅसिफिक बेटदेशांची विशेष परिषद आयोजित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेर्मन यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातो.

चीनकडून गेल्या काही वर्षात पॅसिफिक क्षेत्रात विस्तारवादी हालचाली सुरू आहेत. या क्षेत्रातील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या छोट्या बेटदेशांवर नियंत्रण मिळविण्यासाठी चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून विविध प्रकारची आमिषे दाखविण्यात येत आहेत. यात अब्जावधी डॉलर्सच्या अर्थसहाय्याचा समावेश आहे. चीनच्या या कुटील योजनांना काही देश बळी पडले असून त्यांनी चीनबरोबर विविध प्रकारचे करार केले आहेत. सॉलोमन आयलंडस्‌‍सारख्या बेटदेशाने चीनबरोबर सुरक्षाविषयक करारावरही स्वाक्षऱ्या केल्या असून ही बाब अमेरिका व मित्रदेशांसाठी मोठा धक्का मानला जातो. त्यामुळे चीनच्या कारवायांना शह देण्यासाठी अमेरिकेने आपल्या मित्रदेशांबरोबर या क्षेत्रात जोरदार राजनैतिक हालचाली सुरू केल्या आहेत.

वर्चस्ववादी राजवटीगेल्या काही महिन्यात अमेरिका व ऑस्ेलियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातत्याने पॅसिफिक क्षेत्राचे दौरे सुरू केले आहेत. सध्याचा वेंडी शेर्मन यांचा दौराही त्याचाच भाग आहे. शेर्मन यांनी आपल्या दौऱ्यात समोआ, टोंगा व सॉलोमन आयलंडस्‌‍ या तीन पॅसिफिक बेटदेशांना भेट दिली आहे. त्यानंतर त्या अमेरिकेचे मित्रदेश असणाऱ्या ऑस्ेलिया व न्यूझीलंडचाही दौरा करणार आहेत. पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी अमेरिकेकडून एकत्रित आघाडी उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आघाडी अधिक भक्कम व्हावी यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरतो, अशी माहिती अमेरिकी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

टोंगा या बेटदेशाला दिलेल्या भेटीत शेर्मन यांनी, या देशाचे सामरिक स्थान अत्यंत महत्त्वाचे असल्याची बाब अधोरेखित केली. या स्थानामुळेच चीन या देशात आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. टोंगाचे भविष्य टोंगाच ठरवेल, चीन किंवा इतर कोणताही देश नाही असे सांगून अमेरिकी मंत्र्यांनी चीनच्या धोक्याची जाणीवही करून दिली. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात टोंगाच्या बरोबर संघर्ष केला होता याची आठवण करून देत पुढील काळातही अमेरिकेला तुमचा भागीदार व्हायचे आहे, असे परराष्ट्र उपमंत्री वेंडी शेर्मन यांनी स्पष्ट केले.

सॉलोमन आयलंड्सच्या भेटीतही शेर्मन यांनी दुसऱ्या महायुद्धाचा उल्लेख करून जगातील काही देश युद्धाची काय किंमत असते, हे विसरले आहेत असा टोला लगावला. ‘काही देशांना भूतकाळातून धडे घ्यायचे नसून त्यांचा बळजबरी, दडपण व हिंसाचारासारख्या पोकळ व दिवाळखोर संकल्पनांवर विश्वास आहे. पुढील काळात आपल्याला याविरोधात संघर्ष करावा लागणार आहे’, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

leave a reply