चीनने आण्विक हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

- ब्रिटीश दैनिकाचा दावा

क्षेपणास्त्राची चाचणीलंडन/बीजिंग – चीनने आण्विक क्षमता असलेल्या हायपसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा दावा ब्रिटीश दैनिकाने केला आहे. चाचणीदरम्यान चिनी क्षेपणास्त्राने पृथ्वीच्या भ्रमणकक्षेतून (लो ऑर्बिट) प्रवास केल्याचेही समोर आले आहे. ही चाचणी चीनच्या हायपरसोनिक क्षमतेबरोबरच अंतराळातील क्षमताही दाखवून देणारी ठरते, असा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे. मात्र ही चाचणी यशस्वी ठरली नसून, क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्यापासून ३० किलोमीटरपेक्षा दूर कोसळल्याचे उघड झाले आहे.

ब्रिटनच्या ‘फायनान्शिअल टाईम्स’ने चीनच्या चाचणीचे वृत्त प्रसिद्ध केले असून सदर चाचणी ऑगस्ट महिन्यात पार पडल्याचे सांगण्यात येते. मात्र अमेरिकी यंत्रणांना सुगावा लागू न देता ही चाचणी पार पडली. त्याचवेळी चाचणीदरम्यान चिनी क्षेपणास्त्राने दाखविलेली क्षमता अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना चकित करणारी ठरल्याचा दावाही वृत्तपत्राने केला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्त्यांनी चिनी चाचणीच्या वृत्तावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

गेल्या महिन्यात, अमेरिकेचे हवाईदल व संरक्षण संशोधन संस्था ‘डार्पा’ने हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याचे जाहीर केले होते. हे हायपरसोनिक क्षेपणास्त्र ‘हायपरसोनिक एअर-ब्रीदिंग वेपन कॉन्सेप्ट’ (एचएडब्ल्यूसी) प्रकारातील आहे. विमानातून सोडण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने ‘मॅक ५’पेक्षा अधिक वेग गाठल्याचा दावा ‘डार्पा’कडून करण्यात आला होता. त्यापाठोेपाठ या महिन्याच्या सुरुवातीलाच, रशियाने आण्विक पाणबुडीतून ‘झिरकॉन’ या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती.

हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या क्षेत्रात रशिया इतर देशांपेक्षा आघाडीवर असून या देशाने दोन हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आपल्या संरक्षणदलात सामील केली आहेत. अमेरिकेने हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या असल्या तरी अद्याप ही क्षेपणस्त्रे संरक्षणदलात तैनात करण्यात आलेली नाहीत. चीनने आपल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांबाबत जास्त माहिती उघड करण्याचे टाळले आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनने केलेली चाचणी व त्यासंदर्भात उघड झालेली माहिती लक्ष वेधून घेणारी ठरते.

leave a reply