विमानतळावरील ड्रोन हल्ल्यानंतर सौदीने हौथींवरील हल्ले वाढविले

- अमेरिकेकडून हौथींना हल्ले थांबविण्याची सूचना

रियाध/सना – सौदी अरेबिया व अरब मित्रदेशांनी शुक्रवार व शनिवारी येमेनच्या मारिब प्रांतात चढविलेल्या हवाई हल्ल्यात ३४० हौथी बंडखोर ठार झाल्याचे जाहीर केले. हौथी बंडखोरांनी देखील सलग दोन दिवस सौदीच्या प्रवासी विमानतळांवर ड्रोन्सचे हल्ले चढविले. यामध्ये दहा जण जखमी झाल्याचा दावा केला जातो. यानंतर खवळलेल्या सौदीने हौथींवरील हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढविली असून अमेरिकेने हौथींना मारिब प्रांतातील संघर्ष थांबविण्याची सूचना केली आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून हौथी बंडखोर मारिब प्रांतावर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गेले काही महिने सौदी अरेबिया व अरब मित्रदेश या संघर्षापासून अलिप्त होते. येमेनधील हादी यांच्या सरकारने मारिब वाचविण्यासाठी हौथी बंडखोरांविरोधात संघर्ष सुरू ठेवला होता. पण गेल्या महिन्यात २३ सप्टेंबर रोजी हौथींनी मारिब प्रांतातील अबेदिया जिल्ह्याचा ताबा घेतल्यानंतर सौदी व अरब देशांच्या चिंता वाढल्या होत्या.

महिनाभरापासून हौथींनी सौदीची राजधानी रियाधसह, जेद्दा, जझान या प्रमुख शहरांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन्सचे हल्लेही वाढविले. त्यानंतर सौदी व अरब मित्रदेशांनी मारिबला घेराव टाकणार्‍या हौथी बंडखोरांवरील हल्ले वाढविले. शनिवारी अरब मित्रदेशांच्या आघाडीने हौथींच्या ठिकाणांवर ३२ वेळा हल्ले चढविले. यात १६० जण ठार झाले. तर त्याआधी शुक्रवारी ३६ वेळा केलेल्या कारवाईत १८० हौथींना ठार केल्याचा दावा सौदी व मित्रदेशांच्या आघाडीने केला.

हौथी बंडखोरांनी देखील शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी सौदीच्या जझान येथील किंग अब्दुल्ला प्रवासी विमानतळावर ड्रोन्सचे हल्ले चढविले. या हल्ल्यांमध्ये दहा जण जखमी झाल्याचे सौदीने जाहीर केले. आठवड्यापूर्वी देखील हौथींनी याच विमानतळावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात सौदीसह बांगलादेशी व सुदानी नागरिक जखमी झाले होते. प्रवासी विमानतळाला लक्ष्य करून हौथी बंडखोर युद्धगुन्हे करीत असल्याचा आरोप सौदी व अरब मित्रदेश करीत आहेत.

तर मारिब या इंधनसंपन्न प्रांताचा ताबा मिळविण्यासाठी हौथींनी सुरू केलेल्या हल्ल्यांवर अमेरिकेने चिंता व्यक्त केली. हौथी बंडखोरांनी मारिबवरील हल्ले थांबवावे, अशी सूचना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. तर ड्रोन्सचे हल्ले चढविणार्‍या हौथींवर जपानने टीका केली आहे. सौदीच्या प्रवासी विमानतळांवर ड्रोन्सचे हल्ले चढविणार्‍या हौथी बंडखोरांचे समर्थन करता येणार नसल्याचे जपानचे संरक्षणमंत्री मोतेगी म्हणाले.

leave a reply