इराणला रोखण्यासाठी इस्रायल-सौदी सहकार्य अत्यावश्यक ठरते

- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू

तेल अविव – वेस्ट बँकमधील ज्यूधर्मियांच्या वस्त्यांच्या बांधकामावरून इस्रायलला आखाती देशांमधून कडवा विरोध होत आहे. सौदी अरेबियानेही यावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र इराणला रोखायचे असेल तर इस्रायल व सौदी अरेबियामधील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते, याची जाणीव इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी करून दिली आहे. इस्रायलचे सौदीबरोबरील सहकार्य आणि इराणला रोखणे या दोन्ही एकमेकांमध्ये गुंतलेल्या गोष्टी असल्याचा दावा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून इस्रायलच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा दावा केला जातो. गाझापट्टीतून इस्रायलवरील रॉकेट हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. वेस्ट बँकमधून हमास, इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्यांकडून ज्यूधर्मियांवरील हल्ले इस्रायलसमोरील आव्हान वाढवित आहेत. यामुळे इस्रायलमध्ये संघर्षाचा नवा भडका उडण्याची शक्यता वर्तविली जाते. तर इराणचा अणुकार्यक्रम देखील धोकादायक टप्प्यावर पोहोचल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. इराणचे ड्रोन्स इस्रायलसह आखाती देशांच्या सुरक्षेला आव्हान ठरतील, असे आंतरराष्ट्रीय विश्लेषक बजावत आहेत.

या पार्श्वभूमीवर, मंगळवारी इस्रायलच्या तेल अविव शहरात ‘हार्तोग नॅशनल सिक्युरिटी कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इसायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यासह अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ, अमेरिकेचे माजी राजदूत डेव्हिड फ्रिडमन देखील सहभागी झाले होते. या बैठकीत बोलताना पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी इस्रायल व अरब देशांबरोबरचे वाद सोडविण्याचा पर्याय सुचविला.

‘‘सौदी अरेबियाबरोबरच्या सहकार्याने इस्रायल राजनैतिक आघाडीवर फार मोठी झेप घेईल. या एका सहकार्यामुळे इस्रायलचे इतर अरब देशांबरोबरचे संबंध पूर्णपणे बदलतील. आखातातील इस्रायलच्या स्थानात ऐतिहासिक बदल होतील. परिणामस्वरुप इस्रायल-अरबच नाही तर इस्रायल-पॅलेस्टाईनमधील संघर्ष देखील संपुष्टात येईल’’, असा दावा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी या बैठकीत केला.

त्याचबरोबर अरब देशांना इस्रायल नाही तर इराणपासून सर्वात मोठा धोका असल्याचे इस्रायलच्या पंतप्रधानांनी अधोरेखित केले. इराण हा समान शत्रू असल्यामुळेच इस्रायल व अरब देश एकत्र येत आहेत. या पार्श्वभूमीवर इस्रायलसह अरब-आखाती देशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणाऱ्या इराणला रोखायचे असेल तर इस्रायल व सौदीमधील सहकार्य अत्यावश्यक ठरते. इस्रायलसाठी सौदीबरोबरील सहकार्य व इराणची आक्रमकता रोखणे, या दोन्ही गोष्टी परस्परांशी संबंधित असून हेच इस्रायलचे उद्दिष्ट असल्याची घोषणा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केली.

गेल्या आठवड्यात इस्रायलमधील पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या कॅबिनेट बैठकीत वेस्ट बँकमधील ज्यूधर्मियांच्या वस्त्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. येथील ज्यूधर्मियांच्या बांधकामांना मान्यता देण्याचे इस्रायल सरकारने जाहीर केले होते. येत्या काळात नेत्यान्याहू सरकार ज्यूधर्मियांच्या इतरही बांधकामांना वैधता देणार असल्याचे दावे केले जात होते. इस्रायलच्या या निर्णयावर अरब-आखाती देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, तेल अविवमधील सुरक्षाविषयक बैठकीत बोलताना, इस्रायलपेक्षाही इराण हा अरब देशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असल्याचे पंतप्रधान नेत्यान्याहू पटवून देत आहेत.

दरम्यान, इस्रायल आणि सौदीच्या अधिकाऱ्यांमध्ये गोपनीय चर्चा होणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाली होती. इस्रायल व सौदीमध्ये आधीपासूनच सहकार्य प्र्रस्थआपित झाल्याचा दावा करून केवळ याची घोषणा दोन्ही देशांनी अद्याप केलेली नाही, असा दावा काही वृत्तसंस्थांनी याआधी केला होता.

leave a reply