चिनी कंपन्याकडून डीआर कॉंगोतील सोन्याची लूट

सोन्याची लूटपॅरिस/बीजिंग – चिनी कंपन्या आफ्रिकेच्या डीआर कॉंगोमधील सोन्याची लूट करीत असल्याचा आरोप फ्रेंच अभ्यासगटाने केला. ‘डीआर कॉंगो’च्या साऊथ किवू प्रांतात असणार्‍या खाणींमधून चिनी कंपन्या अवैधपण सोन्याचे उत्पादन व निर्यात करीत असल्याचे ‘आयएफआरआय’ या फ्रेंच अभ्यासगटाने म्हटले आहे. हा अहवाल समोर येत असतानाच ‘डीआर कॉंगो’तील न्यायालयाने चिनी कंपनीकडून चालविण्यात येणार्‍या एका तांब्याच्या खाणीवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

सोन्याची लूट‘आयएफआरआय’ या फ्रेंच अभ्यासगटाने काही दिवसांपूर्वीच ‘अ सायनो-कॉंगोलीज स्कँडल’ नावाचा एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात चिनी कंपन्यांकडून ‘डीआर कॉंगो’मधील सोन्याची लूट सुरू असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या लुटीमुळे स्थानिक जनतेत असंतोष वाढीस लागला असून चिनी कंपन्यांविरोधात निदर्शने तसेच हल्लेही सुरू झाल्याचे अहवालात सांगण्यात आले. चिनी कंपन्या अवैधरित्या सोन्याचा उपसा करून नदीच्या मार्गाने इतर देशांमध्ये निर्यात करण्याचे बेकायदा उद्योग करीत असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.

सोन्याची लूटहा अहवाल प्रसिद्ध होत असतानाच ‘डीआर कॉंगो’च्या सरकारनेही चीनविरोधात हालचाली सुरू केल्याचे समोर येत आहे. गेल्या वर्षी सरकारकडून खनिज क्षेत्रातील काही चिनी कंपन्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. २००८ साली तत्कालिन सरकारने चीनबरोबर केलेल्या सहा अब्ज डॉलर्सच्या करारावरही प्रश्‍नचिन्ह उभे करण्यात आले आहे. ‘डीआर कॉंगो’तील घटना चीनकडून आफ्रिकी देशांमध्ये सुरू असलेल्या साधनसंपत्तीच्या लुटीकडे लक्ष वेधणार्‍या ठरल्या आहेत.

‘डीआर कॉंगो’ची अर्थव्यवस्था खनिज क्षेत्रावर अवलंबून असून हा देश तांबे, कोबाल्ट व सोन्याच्या उत्पादनातील आघाडीच्या आफ्रिकी देशांपैकी एक म्हणून ओळखण्यात येतो.

leave a reply