तैवानजवळील लष्करी सरावावरून चीन व अमेरिकेचे एकमेकांवर ताशेरे

लष्करी सरावबीजिंग/वॉशिंग्टन – साऱ्या जगाचे लक्ष रशिया-युक्रेन युद्धाकडे लागलेले असताना, तैवानच्या क्षेत्रातील तणाव वाढला आहे. मंगळवारी अमेरिकेच्या विनाशिकेने तैवानच्या आखातातून प्रवास करून चीनला चिथावणी दिली. तर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावरुन तैवान हा चीनचा भाग असल्याचा उल्लेख काढून टाकला. यानंतर खवळलेल्या चीनने तैवानच्या आखातात विमाने आणि हेलिकॉप्टर्स रवाना करून सुमारे 100 सॉर्टीज्‌‍ पूर्ण केल्या. तसेच अमेरिका या क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप करीत असल्याची टीका चीनने केली.

गेल्या आठवड्यात चीनच्या लिओनिंग विमानवाहू युद्धनौकेने जपानच्या ओकिनावा बेटसमुहाजवळून प्रवास केला होता. चीनच्या युद्धनौकेची ही गस्त जपानबरोबरच तैवान तसेच अमेरिकेला चिथावणी असल्याचा दावा जपानी माध्यमांनी केला होता. कारण यानंतर चीनच्या युद्धनौकेने तैवानच्या सागरी क्षेत्राजवळून प्रवास केला. त्याआधी चीनच्या 18 लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केली होती.

लष्करी सरावचीन तैवानवर हल्ला चढविण्याची तयारी करीत असून युद्धनौका आणि लढाऊ विमानांच्या या कारवाया त्याचेच संकेत देणारे असल्याचे आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. यानंतर अमेरिकेने जपानमधील आपल्या युद्धनौकांची तैनाती वाढविली होती. ‘युएसएस रोनाल्ड रिगन’ या विमानवाहू युद्धनौकेसह गायडेड क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या विनाशिका देखील अमेरिकेने जपानमध्ये तैनात केल्या होत्या. विमानवाहू युद्धनौका रिगनची जपानमधील तैनाती ही तैवानच्या सुरक्षेसाठी असल्याचे उघड झाले होते. तैवानवरील चीनच्या आक्रमणाची शक्यता बळावल्याचे अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेच्या अध्यक्षा हेन्स यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत, तैवानच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवला तर विमानवाहू युद्धनौका रवाना करण्यास विलंब होऊ नये, याची खबरदार अमेरिकेच्या नौदलाने घेतली आहे. कारण अमेरिका किंवा इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिकेच्या कुठल्याही नौदल तळावरुन तैवानच्या आखातापर्यंतच्या प्रवासात महत्त्वाचा वेळ वाया जाऊ शकतो. यासाठी अमेरिकेच्या नौदलाने विमानवाहू युद्धनौका रिगनला जपानमध्ये तैनात केल्याची माहिती जपानच्या एका दैनिकाने दिली आहे.

लष्करी सरावया नव्या तैनातीनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’ला हादरा देणारा मोठा बदल केला. तैवान हा चीनचा भूभाग असल्याचा उल्लेख अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळातून काढून टाकला. तर पुढच्या काही तासात अमेरिकेच्या ‘युएसएस पोर्ट रॉयल’ या विनाशिकेने तैवानच्या आखातातून प्रवास केला. यावर चीनकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. तैवान हा आपला सार्वभौम भूभाग असल्याचे सांगून चीनने अमेरिका यात हस्तक्षेप करीत असल्याची टीका केली. तसेच अमेरिका वारंवार अशा प्रकारची नाटके करीत असल्याचे ताशेरे चीनने ओढलेआहेत. मात्र तैवानच्या संरक्षणासाठी नौदलाची तैनाती करणाऱ्या अमेरिकेने तैवानला शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याचा पुरवठा करण्यास नकार दिला होता. याची माहिती उघड झाल्यानंतरच चीनच्या तैवानविरोधी कारवायांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसू लागले होते.

leave a reply