तीन वर्षाच्या तणावानंतर सौदी-कतारमध्ये समझोत्याची शक्यता

- आखातातील वृत्तवाहिनीचा दावा

सौदी-कतारदोहा – तीन वर्षांहून अधिक काळचा राजकीय तणाव विसरून पुन्हा सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी सौदी अरेबिया व कतार एकत्र येत आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार जॅरेड कश्‍नर यांनी नुकत्याच केलेल्या आखाती दौऱ्यात यासाठी प्रयत्न केल्याचा दावा ‘अल जझिरा’ या कतारमधील वृत्तवाहिनीने केला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कारकिर्दीत हे संबंध सुधारावे, यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू असल्याचे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. तर आखातातील घडामोडींची तीव्रता वाढत असताना सौदी व कतारमधील या सहकार्याचे महत्त्व वाढले आहे.

20 जानेवारी नंतर ज्यो बायडेन अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेणार आहेत. त्याआधी आखातातील सौदी व कतार या आपल्या मित्रदेशांमधील संबंध सुरळीत व्हावे, यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कश्‍नर यांना आखाती देशांच्या विशेष दौऱ्यासाठी रवाना केले आहे. या भेटीत कश्‍नर यांनी सौदीचे ‘क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान’ तसेच कतारचे आमिर ‘शेख तमिम बिन हमाद अल थानी’ यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेचे तपशील अमेरिका तसेच अरब देशांनी उघड केलेले नाहीत. पण सौदी व कतार यांच्यात संबंध सुरळीत झाल्यास आखातातील तणाव कमी होईल, यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जातो. दोन्ही अरब देशांमधील व्यापार तसेच हवाईसेवा पुन्हा सुरू व्हावी, यासाठी कश्‍नर या दौऱ्यावर असल्याचा दावा अमेरिकेतील वर्तमानपत्राने दोन दिवसांपूर्वीच केला होता.

सौदी-कतार

2017 साली कतार दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा, तसेच आखाती देशांच्या विरोधात जाऊन इराणला सहकार्य करीत असल्याचा आरोप सौदी व इतर अरब देशांनी केला होता. याबरोबर सौदी, युएई, बाहरिन आणि इजिप्त या देशांनी कतारवर बहिष्कार टाकून कतारची कोंडी केली होती. यातून बाहेर पडायचे असेल तर कतारने आपल्या 13 मागण्या पूर्ण कराव्या, अशी अटही सौदी व अरब मित्रदेशांनी केली होती. पण कतारने ही मागणी धुडकावली होती. त्यामुळे कतार व सौदीमधील तणाव वाढला होता.

दरम्यान, कतारला इराणच्या गटातून फोडून इराणला एकटे पाडण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जातो. तर सौदीनेही इराणची कोंडी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी तुर्कीबरोबर चर्चा केल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.

leave a reply