तैवान, अमेरिका व पेलोसी यांच्यावर चीनची आगपाखड सुरूच

बीजिंग – नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीवर शक्य तितकी जहाल प्रतिक्रिया देण्याची तयारी चीनने केली आहे. तैवानच्या सभोवताली चीनने सहा ठिकाणी युद्धसरावांचे आयोजन केले आहे. इथे चीनची शंभराहून अधिक लढाऊ विमाने व दहा युद्धनौका ‘लाईव्ह फायर’ सराव करीत आहेत. कुठल्याही क्षणी तैवानवर हल्ला चढविला जाऊ शकतो, हे या सरावांद्वारे चीन तैवानसह जगाला दाखवून देत आहे. त्याचवेळी पेलोसी व त्यांच्या कुटुंबावर निर्बंधांची घोषणा चीनने केली आहे. याबरोबरच अमेरिकेबरोबरील हवामानबदलापासून ते लष्करी सहकार्यापर्यंतच्या सर्वच आघाड्यांवरील चर्चा चीनने रद्द करून टाकल्या आहेत. याबरोबरच तैवानच्या बाजूने विधाने करणाऱ्या युरोपिय महासंघाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना चीनने समन्स बजावले आहे.

China-crackdownअमेरिकेने पेलोसी यांची तैवान भेट आयोजित करून फार मोठी चूक केली आहे आणि त्याची भयंकर किंमत तैवानसह अमेरिकेलाही चुकती करावी लागेल, हे चीन वेगवेगळ्या मार्गाने दाखवून देत आहे. यासाठी चीनने युद्धसरावांचे आयोजन करून क्षेपणास्त्रांचा माराही केला. याबरोबर तैवानच्या निर्यातीला लक्ष्य करणारे निर्णयही चीनने घोषित केले आहे. इतकेच नाही तर तैवानच्या बाजूने व आपल्या विरोधात विधाने करणाऱ्या देशांनाही अद्दल घडविली जाईल, असा इशारा देण्याचा प्रयत्न चीन करीत आहे. पुढच्या काळात कुठल्याही अमेरिकेच्या अथवा इतर देशांच्या मोठ्या नेत्यांनी चीनच्या विरोधात जाऊन तैवानचा दौरा करू नये, यासाठी चीनची ही धडपड सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

तैवानच्या आखातात सुरू असलेल्या चीनच्या ‘जॉईंट ब्लॉकेज ऑपरेशन्स’ या युद्धसरावाचे व्हिडिओज्‌‍ चीनच्या माध्यमांनी प्रसिद्ध केले आहेत. या सरावात सहभागी झालेल्या चीनच्या शंभराहून अधिक लढाऊ विमानांपैकी काही विमानांचे वैमानिक ‘चला आपण तैवानचा पुन्हा ताबा घेऊया’ अशा स्वरुपाचे दावे ठोकत असल्याचे या व्हिडिओज्‌‍मध्ये दिसत आहे. आपल्या लष्कराने या युद्धसरावात तैवानच्या आखातात नव्या क्षेपणास्त्रांचा मारा केल्याची माहिती दिली. याद्वारे चीन आपण तैवानचा ताबा घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पेलोसी यांचा तैवान दौरा आपण सहजासहजी खपवून घेतला नाही, त्याविरोधात कठोर पावले उचलण्यात आलेली आहेत, हे चीनची राजवट आपल्या जनतेला दाखविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही यामुळे उघड झाले आहे.

पेलोसी यांची तैवान भेट चीनचे सार्वभौमत्त्व व अखंडता यांना आव्हान देणारी असून याद्वारे अमेरिकेने ‘वन चायना पॉलिसी’ला धक्का दिल्याची प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. यामुळे तैवानच्या आखातात अस्थैर्य व अशांतता निर्माण झाल्याचे सांगून यासाठी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेलाच जबाबदार धरले आहे. दरम्यान, चीनचा युद्धसराव व राजनैतिक पातळीवर चीन अमेरिका तसेच युरोपिय महासंघाच्या विरोधात उलचत असलेली पावले, हे सारे प्रतिकात्मक ठरते. प्रत्यक्षात चीन तैवानवर हल्ला चढविण्याची जोखीम सध्या तरी पत्करणार नाही, असे काही विश्लेषक सांगत आहेत. उलट अमेरिकेने पेलोसी यांच्या भेटीद्वारे चीनच्या धमक्या पोकळ आहेत, हे जगाला दाखवून दिले, असा दावा हे विश्लेषक करीत आहेत.

आत्तापर्यंत तैवानबाबत आपण कुठल्याही स्वरुपाची तडजोड करणार नाही, असा इशारा चीनकडून दिला जात होता. तैवानला आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेही प्रतिनिधित्त्व मिळू नये, यासाठी चीन विशेष सावधानता दाखवित होता. अमेरिकेची सत्तासूत्रे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडे आल्यानंतर चीनच्या तैवानविषयक धोरणात आक्रमक बदल झाले होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग तैवान लवकरच आपल्या देशात सहभागी होईल, असे दावे करू लागले होते. त्याचवेळी तैवानच्या प्रश्नावर चीन अमेरिकेशीही टक्कर घेण्याची क्षमता बाळगून असल्याचा विश्वास चीनच्या नेत्यांकडून सातत्याने व्यक्त करण्यात येत होता. मात्र पेलोसी यांच्या भेटीमुळे चीनचे हे दावे पोकळ असल्याचे जगजाहीर झाले आहे. म्हणूनच चीनला आपल्या लष्करी सराव व राजनैतिक पातळीवरील आक्रमक हालचालींद्वारे आपण बरेच काही घडवित असल्याचा आभास निर्माण करायचा आहे. प्रत्यक्षात चीन युद्ध किंवा थेट लष्करी कारवाई करण्याची धोका सध्या तरी पत्करणार नाही, असे सामरिक fविश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply