युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची आंतरराष्ट्रीय समुदायाविरोधात तीव्र नाराजी

Ukrainian-Presidentकिव्ह/मॉस्को – रशियाविरोधात दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धाने जेरीस आलेल्या युक्रेनने आता आपले अपयश लपविण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायावर आगपाखड सुरू केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी युरोपिय महासंघावर आठ अब्ज युरोहून अधिक अर्थसहाय्य रोखून धरल्याचा आरोप केला आहे. त्यापाठोपाठ युक्रेनविरोधात अहवाल सादर करणाऱ्या ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’ या स्वयंसेवी संस्थेवरही टीकास्त्र सोडले आहे. ॲम्नेस्टीने युक्रेनवर टीका करणे म्हणजे रशियाची बाजू घेणे असल्याचा ठपका झेलेन्स्की यांनी ठेवला. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या एका आघाडीच्या दैनिकाने अमेरिकी प्रशासन व युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये रशियाविरोधातील संघर्षाच्या मुद्यावर खटके उडविल्याचे वृत्तही प्रसिद्ध केले होते. दरम्यान, ब्रिटीश गुप्तचर यंत्रणेने रशिया युक्रेनमधील अणुप्रकल्पाचा ढाल म्हणून वापर करीत असल्याचा दावा केला आहे.

international-community-Ukraineरशिया-युक्रेन युद्धाला पाच महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. या कालावधीत रशियाने पूर्व युक्रेनसह दक्षिण युक्रेनमध्ये चांगले सामरिक यश मिळाल्याचे समोर येत आहे. पुढील काळात रशियन फौजा मध्य युक्रेनमध्ये नवे जबरदस्त हल्ले चढवतील, असे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. दुसऱ्या बाजूला युक्रेनी लष्कराचे मनोधैर्य खच्ची होत असल्याच्या तसेच त्यांना मोठी जीवितहानी सोसावी लागल्याचे दावे पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत. आपली लष्करी बाजू सावरण्यासाठी युक्रेनने रशियाने ताब्यात घेतलेल्या भागांवर प्रतिहल्ले करण्याची मोहीम सुरू केली आहे. मात्र त्याला मर्यादित यश मिळाले असून पाश्चिमात्य देशांमध्ये युक्रेनची धोरणे व निर्णयांवरून नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेन अधिकाधिक अस्वस्थ होत असून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याकडून करण्यात आलेली वक्तव्ये त्याचेच परिणाम दिसत आहेत.

international-communityझेलेन्स्की यांनी युरोपिय देशांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून हे देश रशियाविरोधात पुरेशी कठोर भूमिका घेत नसल्याची टीका यापूर्वी केली होती. आता युरोपिय देशांकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्याच्या विलंबावरून त्यांनी युरोपिय देशांना धारेवर धरले आहे. महासंघातील काही देशांनी युक्रेनचे अर्थसहाय्य रोखून ठेवल्याचा आरोप झेलेन्स्की यांनी केला. मात्र या देशांची नावे घेण्यास त्यांनी नकार दिला. यापूर्वी केलेल्या टीकेत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी जर्मनी, हंगेरी, ग्रीस यासारख्या देशांविरोधात नाराजी व्यक्त केली होती.

युरोपिय देशांपाठोपाठ ‘ॲम्नेस्टी’ या आघाडीच्या स्वयंसेवी संस्थेविरोधातही त्यांनी नाराजी व्यक्त केली. या संस्थेने युक्रेन नागरी भागातील लष्करी तैनातीच्या माध्यमातून आपल्या नागरिकांचा जीव धोक्यात टाकत असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यावर टीका करताना झेलेन्स्की यांनी रशियाच्या हल्ल्यांविरोधात कुठेही तैनाती करण्याचा अधिकार आपल्या लष्कराला असल्याचा दावा केला.

दरम्यान, ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेने रशियाचे लष्कर युक्रेनमधील झॅपोरिझिआमध्ये असणाऱ्या अणुप्रकल्पाचा वापर युक्रेनविरोधातील हल्ल्यांसाठी ढाल म्हणून करीत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकल्पात रशियाने प्रगत संरक्षणयंत्रणा तैनात केल्याचेही ब्रिटीश यंत्रणेने म्हटले आहे.

leave a reply