‘बीआरआय’च्या आड चीनचे गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये अतिक्रमण

- पीओकेच्या कार्यकर्त्यांचा आरोप

ग्लासगो – “गेल्या ७३ वर्षांपासून पाकिस्तानव्यात काश्मीरची (पीओके) जनता पाकिस्तानच्या वसाहतवादाने त्रासली आहे. त्यामध्ये आता ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह’च्या (बीआरआय) आड चीनने देखील गिलगिट-बाल्टिस्तानच्या भूमीवर अतिक्रमण केले आहे. यामुळे पीओकेच्या जनतेला पाकिस्तानसोबत चीनचाही वसाहतवाद सहन करावा लागत आहे”, अशा शब्दात ‘पीओके’चे कार्यकर्ते अमजद आयूब मिर्झा यांनी पीओके आणि गिलगिट-बाल्टिस्तानच्या जनतेच्या व्यथा मांडल्या. तसेच गिलगिट-बाल्टिस्तानला पाचवा प्रांत घोषित करणाऱ्या पाकिस्तानवर मिर्झा यांनी सडकून टीका केली.

'बीआरआय'

पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तानची जनता पाकिस्तान आणि आता चीनच्या वसाहतवादाने हैराण झाली आहे. पाकिस्तानचे लष्कर इथल्या जनतेवर क्रूर अत्याचार करीत आहे’, अशी टीका मिर्झा यांनी केली. ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय घेऊन राहत असलेल्या मिर्झा यांनी आपण भारताचे नागरिक आहोत. मात्र येथील जनतेला पाकिस्तान आणि चीनच्या वसाहतवादाचा जाच सहन करावा लागतो, असे ठणकावून सांगितले आहे.

चीनच्या बांधकामाविरोधात आवाज उठविणाऱ्या पर्यावरणतज्ञांना पाकिस्तानने ४०, ६० आणि ९० वर्षांची कडक शिक्षा सुनावली आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये २५ माणसांमागे पाकिस्तानचा एक लष्करी जवान तैनात असतो. पाकिस्तानच्या या जाचाला स्थानिक जनता कंटाळली आहे. पाकिस्तानच पीओकेच्या जनतेचे बळी घेत असल्याचा ठपका मिर्झा यांनी ठेवला.

'बीआरआय'

यासंदर्भांत मिर्झा यांनी अमेरिकेच्या निवडणुकीत यश मिळविणाऱ्या जो बिडेन यांना पत्र लिहले आहे. पीओकेमधून पाकिस्तानवर लष्कर मागे घेण्यासाठी दबाव टाकावा, असे आवाहन मिर्झा यांनी बिडेन यांना केले. पीओके म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा बनला आहे. इथल्या भूमीवर पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देते आणि त्यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये धाडते. जम्मू आणि काश्मीरमध्ये अस्थैर्य निर्माण करण्याचा पाकिस्तानचा कट असल्याचा ठपका मिर्झा यांनी ठेवला .

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘गिलगिट बाल्टिस्तान’ला पाकिस्तानचा पाचवा प्रांत म्हणून घोषित केल्यानंतर इथल्या जनतेचा संताप अनावर झाला आहे. इम्रान खान यांच्या या निर्णयाविरोधात इथली जनता रस्त्यावर येऊन निदर्शने करीत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या विरोधी पक्षाचे नेते बिलावल भुत्तो यांनी गिलगिट बाल्टिस्तानच्या जनतेच्या संवैधानिक हक्क पुरविले जातील, असे आश्वासन दिले. १५ नोव्हेंबर रोजी गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणूक आहे. या निवडणुकीत ‘पाकिस्तान पिपल्स पार्टी’ला मत दिले तर गिलगिट बाल्टिस्तानच्या जनतेला सर्व संवैधानिक हक्क मिळवून दिले जातील, असा दावा भुत्तो यांनी केला.

पण या निवडणुकीला भारताचा विरोध आहे. गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचा भूभाग असून पाकिस्तानने हा भाग खाली करावा, असे भारताने स्पष्टपणे पाकिस्तानला बजावले आहे. गिलगिट बाल्टिस्तानमधील हा बदल भारत खपवून घेणार नाही, असा इशारा भारताने याआधीच दिला होता.

leave a reply