पुंछमधील पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर

पुंछजम्मू – पाकिस्तानी लष्कराने बुधवारी जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील भारतीय सैनिकांच्या चौक्यांवर गोळीबार केला. याला भारतीय सैनिकांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानी लष्कराचे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. भारतीय लष्कराच्या या प्रतिहल्ल्यामुळे पाकिस्तानी जवान खचले असून आपल्या जवानांचे मनोधैर्य उंचविण्यासाठी पाकिस्तानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी वरचेवर सीमारेषेला भेट देत असल्याची माहिती समोर येत आहे. तर पाकिस्तानी हवाईदलाच्या अटक आणि रावळपिंडी येथील हवाईतळांवरील हालचाली वाढल्याचे वृत्त आहे.

भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ९.१५ वाजता पाकिस्तानी लष्कराने संघर्षबंदीचे उल्लंघन करुन भारतीय सैनिकांच्या चौक्या तसेच गस्तीपथकावर हल्ले चढविले. पुंछ जिल्ह्यातील कसबा, शहापूर आणि केरानी सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार तसेच मार्टर्सचेही हल्ले झाले. या महिन्यात पाकिस्तानी लष्कराने १३ वेळा संघर्षबंदीचे उल्लंघन केले असून भारतीय सैनिकांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. बुधवारी देखील भारतीय सैनिकांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी लष्कराची जबर हानी झाल्याचा दावा लष्करी सूत्रांनी केला आहे.

पुंछ

गेल्या सहा महिन्यांमध्ये भारतीय सैनिकांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे किमान ४० जवान मारले गेले असून दीडशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. एकट्या जून महिन्यात पाकिस्तानच्या लष्कराचे १२ जवान ठार झाले तर ३० हून अधिक जखमी झाले होते. भारतीय सैनिकांकडून दिल्या जाणार्‍या या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानच्या जवानांचे मनोबल खचल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मधल्या काळात काही पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील तैनाती नाकारल्याच्या बातम्याही आल्या होत्या.

अशा परिस्थितीत, या जवानांचे मनोधैर्य उंचाविण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी सीमाभागाला भेटी देत असून गेल्याच महिन्यात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांनी इंफंट्री ब्रिगेडला भेट दिली. तर गेल्या काही आठवड्यांमध्ये पाकिस्तानी लष्करातील कमांडो कॉर्प्स तसेच एसएसजीचे वरिष्ठ अधिकारी सीमाभागाला भेट देण्यासाठी आल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय पाकिस्तानी लष्कराने सीमेवरील तैनाती वाढविल्याचे बोलले जाते. मात्र पाकिस्तानी लष्कराने याबाबतचे तपशील उघड केलेले नाहीत.

leave a reply