चीनचा लॅटिन अमेरिका व कॅरेबिअन क्षेत्रातील प्रभाव वाढला

- अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांचा इशारा

वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेचे ‘बॅकयार्ड’ म्हणून ओळख असलेल्या लॅटिन अमेरिका खंड व कॅरेबिअन बेट क्षेत्रातील चीनचा प्रभाव सातत्याने वाढत असल्याचा इशारा अमेरिकेच्या संरक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या संसदीय समितीत झालेल्या सुनावणीदरम्यान हा इशारा देण्यात आल्याचे समोर आले आहे. सुनावणीदरम्यान बायडेन प्रशासनाकडून या खंडाकडे होत असलेल्या दुर्लक्षावरही बोट ठेवण्यात आले. डिसेंबर २०२१मध्ये चीन व लॅटिन अमेरिकी देशांची संघटना असणाऱ्या ‘सेलॅक’ मध्ये व्यापक करार झाला होता. या कराराच्या माध्यमातून चीन लॅटिन अमेरिकी देशांना अणुतंत्रज्ञानासह अंतराळक्षेत्र, ५जी तसेच संरक्षणविषयक सहकार्य पुरविणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

चीनचा लॅटिन अमेरिका व कॅरेबिअन क्षेत्रातील प्रभाव वाढला - अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांचा इशाराअमेरिकी नौदलाच्या सदर्न कमांडच्या प्रमुख असणाऱ्या जनरल लॉरा रिचर्डसन यांची संसदेच्या ‘हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी’समोर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान जनरल रिचर्डसन यांनी चीनकडून लॅटिन अमेरिकी क्षेत्रात सुरू असलेल्या कारवायांकडे लक्ष वेधले. ‘चीनने या क्षेत्रात दुहेरी वापर (नागरी व लष्करी) करता येईल अशा अंतराळ उपक्रमांची उभारणी केली आहे. मोठ्या अर्थसहाय्याच्या बळावर या क्षेत्रातील राजवटींना तालावर नाचविण्याची क्षमता चीनकडे आहे. याव्यतिरिक्त लॅटिन अमेरिकेतील बंदरे व खनिजांच्या खाणींसारख्या संवेदनशील तसेच महत्त्वाच्या उपक्रमांवर चीनने ताबा मिळविला आहे’, असे सदर्न कमांडच्या प्रमुखांनी बजावले.

‘चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून या क्षेत्रातील राष्ट्रप्रमुखांशी सातत्याने संपर्क साधला जातो. अमेरिकेनेही हेच धोरण राबवायला हवे. मात्र ब्राझिल, चिली यासारख्या क्षेत्रातील आघाडीच्या देशांमध्ये अनेक वर्षे अमेरिकेचा राजदूतही नेमण्यात आलेला नाही. ही बाब अमेरिकी प्रशासन गंभीर नसल्याचे दाखवून देते’, अशा शब्दात जनरल लॉरा रिचर्डसन यांनी बायडेन प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर कोरडे ओढले.

चीनने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह’ अंतर्गत लॅटिन अमेरिकी देशांमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. गेल्या १६ वर्षात चीनकडून लॅटिन अमेरिकी देशांना विविध क्षेत्रातील प्रकल्पांसाठी जवळपास १५०अब्ज डॉलर्सचे कर्ज दिल्याची माहिती समोर आली आहे. तर गेल्या दोन दशकात चीन व लॅटिन अमेरिकी देशांमधील व्यापार तब्बल २५ पटींनी वाढला आहे. २००० साली चीन व लॅटिन अमेरिकी देशांमधील व्यापार १२ अब्ज डॉलर्स होता, तर आता तो ३०० अब्ज डॉलर्सहून अधिक आहे. बऱ्याच लॅटिन अमेरिकी देशांसाठी चीन हा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनला आहे. यापूर्वी हे स्थान अमेरिकेकडे होते.

जागतिक व्यापाराच्या दृष्टिने महत्त्वाच्या असणाऱ्या ‘पनामा कालवा’ क्षेत्रातील दोन बंदरे सध्या चीनच्या ताब्यात आहेत. लॅटिन अमेरिकेतील अर्जेंटिना, बोलिव्हिआ व चिली हे देश ‘लिथिअम ट्रँगल’ म्हणून ओळखण्यात येतात. त्यातील बोलिव्हिआच्या लिथिअम क्षेत्रात चीनने एक अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे. अर्जेंटिनात चिनी कंपनीकडून अंतराळस्थानक उभारण्यात आले असून याचा वापर अमेरिकेच्या क्षमतांना लक्ष्य करण्यासाठी होऊ शकतो, असे संरक्षण विभागाकडून बजावण्यात आले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत चीनला रोखण्याचे प्रयत्न सुरू झाले होते, पण नंतर आलेल्या बायडेन प्रशासनाने चीनच्या हालचाली अजूनही फारशा गांभीर्याने घेतल्या नसल्याचा दावा विश्लेषक करीत आहे.

हिंदी English

 

leave a reply