‘साऊथ चायना सी’मध्ये चीनचा महिनाभर युद्धसराव

युद्धसरावबीजिंग – चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’ने साऊथ चायना सीच्या सागरी क्षेत्रात महिनाभर चालणारा युद्धसराव सुरू केला आहे. या युद्धसरावाच्या पार्श्‍वभूमीवर, परदेशी नौका किंवा जहाजांनी घोषित सागरी क्षेत्राच्या पाच किलोमीटरच्या परिघात प्रवेश करू नये, असा इशारा चीनने दिला आहे. सदर क्षेत्रातील अमेरिकी युद्धनौका व विमानांची गस्त आणि गेल्या काही दिवसांपासून फ्रान्सच्या युद्धनौकेचा वाढता सहभाग, या पार्श्‍वभूमीवर हा युद्धसराव आयोजित केल्याचे चीनच्या मुखपत्राने म्हटले आहे.

चीनच्या लष्कर साऊथ चायना सीच्या क्षेत्रात लाईव्ह फायरिंग सरावाचे आयोजन करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. चीनच्या आघाडीच्या ‘सीसीटीव्ही’ या वृत्तवाहिनीने देखील यासंबंधी बातमी प्रसिद्ध केली होती. पण सदर सराव कुठल्या क्षेत्रात व कधी सुरू होईल, याची काहीच माहिती उघड झाली नव्हती. पण आपल्या अपारदर्शी लष्करी व्यवहारांसाठी प्रसिद्ध असलेल्या चीनने सोमवारपासूनच हा युद्धसराव सुरू केला.

लेझोऊ पेनिन्स्यूलाच्या सागरी क्षेत्रात सोमवारी 1 मार्चपासून सुरू झालेला हा युद्धसराव 31 मार्चपर्यंत चालणार आहे. या युद्धसरावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या सागरी प्रशासनाने परदेशी जहाजे, गस्तीनौका आणि युद्धनौकांसाठी विशेष सूचना जारी केली आहे. यामध्ये पुढील महिनाभरासाठी परदेशी जहाजांनी ग्वांगदाँग प्रांताच्या सागरी क्षेत्रापासून पाच किलोमीटर अंतरावर फिरकू नये, असे चीनने बजावले आहे.

leave a reply