इराणच्या अणुकार्यक्रमाला चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे समर्थन

बीजिंग – ‘इतिहासात वेळोवेळी चीन आणि इराणने परस्परांना सहाय्य केले तसेच दोन्ही देश एकमेकांसोबत उभे राहिले होते. आत्ताही जागतिक स्तरावर गुंतागुंतीच्या घडामोडी सुरू असताना चीन आणि इराणमध्ये सहकार्य मजबूत होत असून इराणच्या अणुकार्यक्रमाला चीनचा पाठिंबा आहे’, अशी घोषणा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केली. इराणच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे विशेषदूत सौदी अरेबियाला रवाना झालेले आहेत. अशा परिस्थितीत, चीनने इराणच्या अणुकार्यक्रमाला आपला पाठिंबा जाहीर करून सौदी तसेच इतर आखाती देशांना दुखावणारे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे.

jinping raisiइराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी सोमवारी चीनचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. गेल्या २० वर्षांमध्ये इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी पहिल्यांदाच चीनचा दौरा केला आहे. मधल्या काळात चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणचे दौरे केले होते. पण इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा चीनचा दौरा शक्य झाला नव्हता. त्यातच इराणमध्ये राजवटविरोधी आंदोलन सुरू असताना राष्ट्राध्यक्ष रईसी चीनच्या दौऱ्यावर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते. पण आंतरराष्ट्रीय तसेच क्षेत्रीय घडामोडी देखील राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या या चीन दौऱ्यामागील महत्त्वाचे कारण असल्याचा दावा केला जातो.

आपल्या या पहिल्या चीन दौऱ्यात इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी २० सहकार्य करार केले. यामध्ये व्यापार, पर्यटन क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे. २०२१ साली चीन व इराणमध्ये पार पडलेल्या २५ वर्षांसाठीच्या अब्जावधी डॉलर्सच्या सहकार्य करारा व्यतिरिक्त हे २० करार पार पडल्याचे चीनच्या सरकारने स्पष्ट केले. चीन हा इराणच्या इंधनाचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. तसेच चीनने इराणमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, याकडे चीनचे सरकारी मुखपत्र लक्ष वेधत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी देखील अणुकराराच्या मुद्यावर इराणच्या पाठिशी असल्याचे जाहीर केले.

२०१५ सालच्या अणुकराराचा प्रश्न पाश्चिमात्य देशांनी लवकरात लवकर सोडवावा. या मुद्यावर तसेच इराणच्या अणुकार्यक्रमाला चीनचे पूर्ण समर्थन आहे, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या चर्चेनंतर केली. तसेच इराणला आपल्या सार्वभौमत्त्वाच्या सुरक्षेचा तसेच एकाधिकारशाहीला विरोध करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे जिनपिंग यांनी जाहीर केले. इराणच्या कारभारात त्रयस्थ देशांच्या हस्तक्षेपाला चीनचा विरोध असल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी अमेरिकेसह इस्रायल तसेच सौदी व आखाती देशांना इशारा दिल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी सौदी अरेबियाचा दौरा करून अब्जावधी डॉलर्सच्या सहकार्याची घोषणा केली होती. सौदी व इतर आखाती मित्रदेशांबरोबर इंधन सहकार्य करण्याचे संकेत जिनपिंग यांनी दिले होते. तर पर्शियन आखातातील युएई दावा करीत असलेल्या बेटांचा मुद्दा उपस्थित करून जिनपिंग यांनी इराणला डिवचले होते. आखाती माध्यमांनी जिनपिंग यांच्या इराणविरोधी भूमिकेचे स्वागत केले होते. पण चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या या दौऱ्यावर इराणकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. तर आत्ता इराणचे राष्ट्राध्यक्ष चीनच्या दौऱ्यावर असताना जिनपिंग यांनी वादग्रस्त अणुकार्यक्रमाचे समर्थन करून सौदी व इतर आखाती देशांना दुखावणारे धोरण स्वीकारले आहे.

leave a reply