अमेरिका येमेनमध्ये पकडलेली ‘इराणी शस्त्रे’ युक्रेनला पाठविणार

अमेरिकी दैनिकाचा दावा

वॉशिंग्टन – अब्जावधी डॉलर्सच्या शस्त्रपुरवठ्यानंतरही युक्रेनला रशियाविरोधी संघर्षात शस्त्रांची टंचाई भासत असल्याचे दावे समोर येत आहे. युक्रेनची ही टंचाई दूर करण्यासाठी अमेरिकेने इराणची शस्त्रे युक्रेनला पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षी अमेरिका व फ्रान्सने येमेनमध्ये केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर इराणी शस्त्रसाठा जप्त केला होता. हीच शस्त्रे युक्रेनला धाडण्याच्या प्रस्तावावर बायडेन प्रशासन विचार करीत असल्याचा दावा आघाडीच्या अमेरिकी दैनिकाने केला आहे.

Iranian weaponsगेल्या वर्षी अमेरिका व फ्रान्सने येमेनच्या सागरी क्षेत्रात केलेल्या कारवायांमध्ये रायफल्स व राऊंडस्‌‍सह मोठा शस्त्रसाठा ताब्यात घेतला होता. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या नियमांनुसार सदर साठा नष्ट करणे अथवा सुरक्षित साठवून ठेवणे बंधकारक आहे. मात्र बायडेन प्रशासनाने त्यातून पळवाट काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या माध्यमातून जवळपास पाच हजारांहून अधिक ‘ॲसॉल्ट रायफल्स’, १६ लाख ‘स्मॉल आर्म्स ॲम्युनिशन राऊंडस्‌‍’, रणगाडाभेदी रॉकेटस्‌‍ व सात हजार फ्युजेस युक्रेनला पाठविण्याची योजना आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

इराण रशियाला ड्रोन्स व इतर शस्त्रास्त्रे पुरवित असल्याचे आरोप अमेरिका आणि युरोपिय देश करीत आहेत. या पार्श्वभूमीवर कारवाईत पकडलेला शस्त्रसाठा परस्पर युक्रेनला पाठविण्याच्या हालचाली लक्ष वेधून घेणाऱ्या ठरतात.

leave a reply