प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सन्मानिय माघारीसाठी चीनची धडपड

- तणाव कमी करण्यावर ब्रिगेडिअर स्तरावरील चर्चेत सहमती

नवी दिल्ली – भारत आणि चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अधिक तैनाती न करण्यावर दोन्ही देशांच्या लष्करी चर्चेत सहमती झाल्याचे वृत्त आहे. मात्र, सैन्यमाघारी करुन दोन्ही देशांमध्ये समझौता होऊ शकलेला नाही. मात्र, चर्चेच्या पुढच्या फेरीत यावर अधिक विस्ताराने बोलणी करुन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सौहार्द प्रस्थापित करण्याचा निर्णय दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्‍यांनी घेतला. दोन्ही देशांच्या ब्रिगेडिअर स्तरावरील बैठकीनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करुन ही घोषणा करण्यात आली. याआधीही मॉस्कोमध्ये भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा झाल्यानंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले, पण त्यानंतरच्या काळात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी न होता, अधिकच वाढला होता.

चीनची धडपड

दोन्ही देशांच्या ब्रिगेडिअर्सच्या चर्चेनंतर प्रसिद्ध करण्यात आलेले हे संयुक्त निवेदन म्हणजे तणाव कमी करण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले पहिले पाऊल असल्याचे संकेत दोन्ही देशांकडून दिले जात आहेत. मात्र, या चर्चेत चीनने २९ ऑगस्टच्या आधीची स्थिती प्रस्थापित व्हावी, अशी मागणी केली. याचाच अर्थ, भारताने पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडील महत्त्वाच्या शिखरांवर मिळविलेले नियंत्रण सोडून मागे फिरावे, असे चीनचे म्हणणे आहे. तर भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एप्रिलच्या आधीची स्थिती अपेक्षित असल्याचे चीनला बजावले. त्यामुळे घुसखोरी करणार्‍या चिनी सैन्याला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन पूर्ण माघार घ्यावी लागणार आहे. ही मागणी मान्य करण्यास चीनने नकार दिला तर चीनच्या मागणीला भारतानेही नकार देऊन आपण माघार घेणार नसल्याचे या चर्चेत स्पष्ट केले.

या मुद्द्यावर दोन्ही देशांचे मतभेद तीव्र असले तरी पुढच्या काळात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अधिक तैनाती वाढवून तणावात भर टाकायची नाही, यावर ब्रिगेडिअर्सच्या चर्चेत सहमती झाली आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये झालेल्या सीमावादावरील चर्चेच्या चौकटीतच पुढची चर्चा पार पडेल, असाही निर्णय सहमतीने घेण्यात आला आहे. असे असले तरी, दोन्ही देशांनी लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेली प्रचंड प्रमाणातील लष्करी तैनाती पाहता, इथला तणाव इतक्यात तरी निवळण्याची शक्यता नाही. सध्या चीनचे जवान लडाखमधील कडक हिवाळ्याला तोंड देण्यास तयार नसल्याने या क्षेत्रातील तैनाती कमी करणे चीनच्या हिताचे आहे. त्याचवेळी भारतानेही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तैनाती केल्याने चीनचाही कुठलाही हेतू साध्य होणे, अशक्यकोटीतली बाब बनली आहे. त्यामुळे चीन आता सामोपचाराची भाषा बोलू लागला आहे. मात्र पुढच्या काळात संधी मिळताच चीन उलटल्याखेरीज राहणार नाही, हे लक्षात घेऊन भारताने लष्करी आक्रमकता कायम ठेवावी आणि चीनवरील दबाव वाढवावा, असे माजी लष्करी अधिकारी सुचवित आहेत.

चीनची धडपड

भारत आणि चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात करुन परत आपण युद्धासाठी सज्ज असल्याचा संदेश परस्परांना दिला होता. पण आता अतिरिक्त तैनाती थांबविण्याची घोषणा करुन दोन्ही देश एकमेकांना आपण युद्धाची तयारी करीत नसल्याचा संदेश देत आहेत. ही समाधानाची बाब ठरते, असा दावा चीनच्या ‘चेंगडू इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड अफेअर्स’ या अभ्यासगटाचे अध्यक्ष लाँग शिंग्चून यांनी केला आहे व त्यावर समाधानही व्यक्त केले. भारताला १९६२ सालच्या पराभवाची आठवण करुन देणार्‍या चीनच्या भूमिकेत झालेला हा बदल लक्षणीय ठरतो. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील घुसखोरीनंतर भारताची प्रतिक्रिया जोखण्यात केलेली चूक चीनला आता अशारितीने सन्मानिय माघार घेण्यास भाग पाडत आहे.

चीनची धडपडमात्र, चीनने हा सुज्ञ निर्णय घेण्यासाठी खूप विलंब केला आणि आपली फार मोठे नुकसान करुन घेतल्याचे समोर येत आहे. भारताचा विश्वासघात करुन पुन्हा एकदा घुसखोरी करणार्‍या चीनला भारताने याची जबर आर्थिक किंमत मोजण्यास भाग पाडले आहे. इतकेच नाही तर चिनी उत्पादनांशिवाय भारताचे चालू शकणार नाही, असे दावे ठोकणार्‍या चीनचा नक्शाही भारताने उतरविला आहे. गलवान व्हॅलित हल्ला चढविल्यानंतर भारताकडून मिळालेल्या जहाल लष्करी प्रत्युत्तराबरोबरच चिनी अॅप्स व कंपन्यावरील बंदी यासारखे कठोर निर्णय भारत घेऊ शकेल, याचा विचार चीनने केला नव्हता. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आगळिकीची जबर किंमत चीनला चुकती करावी लागत आहे.

असे असले तरी भारताच्या कणखर भूमिकेसमोर आपल्याला नमते घ्यावे लागले, असा संदेश जाऊ नये यासाठी चीनची कम्युनिस्ट राजवट धडपडत आहे. विशेषत: चीनच्या जनतेमध्ये हा संदेश पोहोचला तर त्याचे विपरीत परिणाम होतील, याची जाणीव राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना झाली आहे. त्यामुळे भारताबरोबरील सीमावाद हा राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या राजकीय प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. याची जाणीव भारतीय मुत्सद्दी करुन देत आहेत. म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत, चीनवर विश्वास ठेवण्याची चूक भारताने करु नये, असे जेष्ठ्य मुत्सद्द्यांचे म्हणणे आहे.

leave a reply